निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात रत्नागिरीत काँग्रेसचा मूकमोर्चा

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणुकीची मागणी

रत्नागिरी, दि. ५ : मतदानाच्या मूलभूत अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या वतीने सोमवारी रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ प्रक्रियेला विरोध करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना पदावरून बडतर्फ करावे, अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश कीर, सरचिटणीस हुस्नबानू खलिफे, दक्षिण रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जमीर खलिफे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

रमेश कीर यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत ‘एसआयआर’च्या नावाखाली गोंधळ सुरू असल्याचा आरोप केला. या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने आवाज उठवत असून, निवेदन राष्ट्रपतींकडे पाठवून मुख्य निवडणूक आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हुस्नबानू खलिफे यांनी हा मोर्चा २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान आयोजित ‘लोकशाही बचाव आंदोलना’चा भाग असल्याचे सांगितले. ‘एसआयआर’ प्रक्रिया रद्द करावी, मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात, अशा मागण्या त्यांनी मांडल्या. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही काँग्रेस नेत्यांनी दिला.

आणखी वाचा