राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवा एकत्र येणार!

वर्षअखेरीपर्यंत ४,५०० अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवेत दाखल होणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

मुंबई, दि. १४ : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम, वेगवान आणि दर्जेदार करण्यासाठी शासनाच्या १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच वर्षअखेरीपर्यंत राज्यभरात ४ हजार ५०० नवीन अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवेत दाखल करण्याचे नियोजन आहे. यामुळे रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळण्यास मदत होईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

सध्या अपघात आणि गंभीर आजारांसाठी १०८, तर गर्भवती महिला आणि बालकांसाठी १०२ ही रुग्णवाहिका सेवा स्वतंत्रपणे कार्यरत आहे. या दोन्ही सेवांचे एकत्रीकरण करून एकाच मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून कॉलचे व्यवस्थापन केले जाणार आहे. मदतीसाठी संपर्क साधल्यानंतर रुग्णाच्या जवळ उपलब्ध असलेली रुग्णवाहिका तातडीने पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

जीपीएससह अत्याधुनिक सुविधा

नवीन रुग्णवाहिकांमध्ये प्रगत जीवनरक्षक सुविधा असलेल्या ॲडव्हान्स्ड लाईफ सपोर्ट (एएलएस) आणि बेसिक लाईफ सपोर्ट (बीएलएस) प्रकारांचा समावेश असेल. सर्व रुग्णवाहिका जीपीएस प्रणालीशी जोडण्यात येणार असून, नियंत्रण कक्षाला त्यांचे अचूक स्थान समजणार आहे. त्यामुळे गरजेनुसार जवळची रुग्णवाहिका तातडीने रवाना करणे शक्य होईल.

ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागांतील नागरिकांना या व्यवस्थेचा विशेष लाभ होण्याची अपेक्षा आहे. गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात पोहोचविणे तसेच गंभीर रुग्णांना वेळेत उपचार उपलब्ध करून देणे अधिक सुलभ होणार आहे.

‘गोल्डन अवर’मध्ये उपचारांना प्राधान्य

अपघात, हृदयविकार आणि अन्य गंभीर वैद्यकीय परिस्थितींमध्ये पहिला तास म्हणजेच ‘गोल्डन अवर’ अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात वैद्यकीय उपचार मिळाल्यास रुग्णाचे प्राण वाचविण्याची शक्यता वाढते. रुग्णवाहिका सेवांच्या एकत्रीकरणामुळे प्रतिसाद वेळ कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.

राज्यातील प्रत्येक नागरिकाला वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. १०२ आणि १०८ सेवांच्या एकत्रीकरणामुळे आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल. जीपीएस प्रणाली, जीवनरक्षक उपकरणे आणि एकात्मिक नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

आणखी वाचा