कुडाळ (सिंधुदुर्ग), दि. १८ : मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी मिळाल्याने नव्या आयुष्याची स्वप्ने पाहणाऱ्या २३ वर्षीय दामिनी किरण पालव हिची एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना कुडाळ तालुक्यातील कडावल-वर्दे परिसरात घडली. या प्रकरणी तिचा वर्गमित्र साहिल विश्राम धुरी याला पोलिसांनी काही तासांत अटक केली. कुडाळ न्यायालयाने त्याला २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दामिनीने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले होते. मुंबईत नोकरी मिळाल्याने तिच्या आयुष्याला नवी दिशा मिळणार होती. मात्र, नोकरीसाठी जाण्याच्या तयारीत असतानाच तिच्या आयुष्याचा दुर्दैवी अंत झाला. घरच्यांसाठी खाऊ आणण्याच्या विचाराने घरी निघालेल्या दामिनीच्या हत्येने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हादरला आहे.
आईशी झालेला संवाद ठरला अखेरचा
घटनेच्या दिवशी दामिनी महाविद्यालयातून शिक्षण आटोपून एसटीने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कडावल बसस्थानकात उतरली. घरी जाण्यापूर्वी तिने आईला फोन केला. ‘तुला वडापाव वगैरे काही खायला आणू का?’ अशी मायेने विचारणा करत ती घरच्यांसाठी खाऊ घेण्याच्या विचारात होती. आईशी झालेला हा साधा संवाद तिच्या आयुष्यातील अखेरचा ठरला.
कडावल-वर्दे पुलाजवळ साहिल धुरीने तिला अडविल्याचा आरोप आहे. प्रेमप्रस्तावाला दामिनीने नकार दिला होता. तसेच तिचे लग्न ठरल्याची माहिती मिळाल्याने संतप्त झालेल्या साहिलने तिला नदीपात्रात ओढून नेले. तेथे धारदार शस्त्राने तिच्या पायावर, पोटावर आणि मानेवर वार करून हत्या केल्याचा आरोप आहे.
दामिनीने मदतीसाठी आर्त हाक दिल्याचे सांगितले जाते. मात्र, तिचा आवाज नेमका कुठून येत आहे, हे लक्षात न आल्याने तिला वेळीच मदत मिळू शकली नाही. काही वेळाने दूध घालण्यासाठी डेअरीकडे जाणाऱ्या स्थानिकांना ती नदीपात्राजवळ रक्तबंबाळ अवस्थेत आढळली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि तिला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्यांवरून आरोपी जेरबंद
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि कुडाळ पोलिसांनी तपासाला वेग दिला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात आला. त्यानंतर वेंगुर्ले तालुक्यातील मठ-धुरीवाडा येथून साहिल धुरीला ताब्यात घेण्यात आले.
संशयिताच्या घरातून रक्ताचे डाग असलेले कपडे आणि गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर गुन्ह्यातील हत्यार शोधणे आणि हत्येमागील नेमकी पार्श्वभूमी उघड करण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली. न्यायालयाने त्याला २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दामिनीच्या स्वप्नांचा दुर्दैवी अंत
मुंबईतील नोकरी, करिअरची नवी सुरुवात आणि कुटुंबाच्या सुखासाठी पाहिलेली स्वप्ने दामिनीच्या आयुष्यासोबतच संपली. आईसाठी खाऊ आणण्याच्या साध्या विचाराने घराकडे निघालेल्या तरुणीचा असा अंत झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
एकतर्फी प्रेमातून दुसऱ्या व्यक्तीच्या निर्णयावर हक्क गाजवण्याची मानसिकता किती भयावह ठरू शकते, हे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे. प्रेमाला नकार देण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्या नकाराचा राग मनात धरून हिंसेचा मार्ग स्वीकारणे हा गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना कायद्यानुसार शिक्षा मिळणे आवश्यक आहे.








