रत्नागिरी, दि. २२ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी मराठा आरमाराच्या वारशाला अभिवादन करत ‘२ महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी, रत्नागिरी’तर्फे राष्ट्रीय स्तरावरील ‘मेन्यू २७’ (MENU 27) या साहसी सागरी नौकानयन मोहिमेला अल्ट्राटेक जेटी येथून दिमाखात प्रारंभ झाला. कोल्हापूर एनसीसी मुख्यालयाचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर. के. पैठणकर आणि २ महाराष्ट्र नेवल युनिटचे कमांडिंग ऑफिसर कमांडर रामबल्लूब दीक्षित यांनी हिरवा झेंडा दाखवून मोहिमेचे उद्घाटन केले.
या मोहिमेत संपूर्ण महाराष्ट्रातून निवडलेले ६० एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले आहेत. यामध्ये २५ मुली आणि ३५ मुलांचा समावेश आहे. हे कॅडेट्स २७ फूट लांबीच्या पारंपरिक ‘डीके व्हेलर’ नौकांमधून रत्नागिरी ते पलशेत आणि परतीचा सुमारे २५० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहेत. तिवरी, जयगड, बोरिया आणि पलशेत येथे मोहिमेदरम्यान मुक्काम असणार आहे.
मोहिमेपूर्वी ६ ते १५ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या दहा दिवसांच्या विशेष प्रशिक्षण शिबिरात कॅडेट्सना नौकानयन, दिशादर्शन, बोट पुलिंग, रिगिंग आणि बचावकार्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या मोहिमेमुळे तरुणांमध्ये नेतृत्वगुण, धाडस, आत्मविश्वास आणि शिस्त विकसित होण्यास मदत होणार आहे.
ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर. के. पैठणकर यांनी ही मोहीम म्हणजे तरुणांसाठी जीवनशाळा असल्याचे सांगितले. खुल्या समुद्रातील आव्हानांचा सामना करताना कॅडेट्सना कोकणच्या समृद्ध सागरी इतिहासाची प्रत्यक्ष अनुभूती मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
या मोहिमेच्या माध्यमातून सामाजिक जनजागृतीवरही भर देण्यात येणार आहे. मुक्कामाच्या गावांमध्ये पथनाट्ये, रॅली आणि व्याख्यानांद्वारे तटीय सुरक्षा, सागरी स्वच्छता आणि प्रदूषणमुक्तीचा संदेश दिला जाणार आहे. ‘कोकण ज्ञान तरंग’ ही संकल्पना आणि ‘जाणाऱ्या वाटा, प्रगतीच्या वाटा’ हे ध्येयवाक्य या मोहिमेला लाभले आहे.
राष्ट्रीय स्तरावरील ‘मोस्ट एंटरप्रायझिंग नेवल युनिट’ या पंतप्रधान रोलिंग ट्रॉफी स्पर्धेच्या दृष्टीनेही ही मोहीम महत्त्वाची आहे. सागरी सुरक्षेसाठी तीन विशेष एस्कॉर्ट आणि हाय-स्पीड बचाव नौका तैनात करण्यात आल्या आहेत. वेस्टर्न नेवल कमांड, कोस्ट गार्ड स्टेशन, एमआरएमसी मुंबई, प्रादेशिक बंदर कार्यालय, सीमाशुल्क विभाग आणि जिल्हा प्रशासनाचे या मोहिमेला सहकार्य लाभले आहे.
साहस, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीचा संगम असलेल्या या मोहिमेमुळे कोकणच्या सागरी वारशाला उजाळा मिळणार असून, तरुण कॅडेट्सच्या जिद्दीचे दर्शन घडणार आहे.








