जिंदाल कामगारांच्या वेतनवाढीसह गॅस टर्मिनल स्थलांतरासाठी २ नोव्हेंबरला आमरण उपोषण

प्रहार संघटना, शेतकरी आणि मच्छीमारांचा इशारा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

रत्नागिरी, दि. २३ : जिंदाल कंपनीतील कामगारांची वेतनवाढ, प्रलंबित प्रश्नांचे निराकरण आणि नांदिवडे येथील प्रस्तावित गॅस टर्मिनलचे स्थलांतर या मागण्यांसाठी प्रहार कामगार संघटना, प्रहार सामाजिक संघटना, स्थानिक शेतकरी आणि मच्छीमारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मागण्यांवर तोडगा न निघाल्यास सोमवार, २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नांदिवडे आणि जयगड परिसरातील शेतकऱ्यांच्या निवेदनानुसार, लोकवस्तीत गॅस टर्मिनल उभारण्याच्या हालचालींना स्थानिकांचा विरोध आहे. या कामाला महाराष्ट्र सागरी मंडळाने २७ मे २०२५ रोजी स्थगिती दिली होती, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. तरीही पुन्हा हालचाली सुरू झाल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. गॅस टर्मिनल रहिवासी भागातून स्थलांतरित केल्याचे ३० ऑक्टोबरपर्यंत अधिकृतपणे जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. परिसरातील प्रदूषण, आरोग्याच्या समस्या आणि खंडित वीजपुरवठ्याबाबतही स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, जिंदाल कंपनीत १७ ते १८ वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांना केवळ १० ते १२ हजार रुपये वेतन मिळत असल्याचा दावा प्रहार कामगार संघटनेने केला आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर वेतनवाढ आणि इतर प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत प्रशासनाने कंपनी व्यवस्थापनाला निर्देश देऊन मागण्यांवर लेखी तोडगा काढावा, अन्यथा उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

प्रहार सामाजिक संघटनेच्या कोकण महिलाध्यक्षा काजल परेश नाईक, ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष तथा कायदेशीर सल्लागार स्वप्निल पाटील आणि रत्नागिरी जिल्हाध्यक्ष गुरुनाथ सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होणार आहे. प्रहार कामगार संघटनेचे अध्यक्ष रोहन रमेश सुर्वे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कामगार, शेतकरी आणि मच्छीमार मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

प्रशासनाने या प्रश्नांमध्ये तातडीने हस्तक्षेप करून कामगार, शेतकरी आणि मच्छीमारांना न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

संग्रहित फोटो

आणखी वाचा