पोलादपूर महाडचा विकास हा केवळ ठेकेदारी व जिप-पंसचे उमेदवार निवडणे नसून विविध क्षेत्रातील लोकांना चालना देण्याची वृत्ती ठेवावी

पोलादपूर, दि. १३ (शैलेश  पालकर)- पोलादपूरसाठी मुंबै बँकेच्या माध्यमातून आपण कोटयवधीचा निधी कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देऊ शकतो. पण ज्या पध्दतीने माजी मंत्री स्व.प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदरराव मोरे महाविद्यालय, शिवाई शिक्षण संस्था व पतसंस्थेसाठी ऍड.काळे, ऍड.देशमुख आणि सहकाऱ्यांनी व्रतस्थपणे काम पाहिले, अशा लोकांना चालना देण्याची नेतृत्वाची वृत्ती असावी. यामुळेच या महाविद्यालयाला आमदारनिधीतून 25 लाख रूपये देतानाच जर व्यापक दृष्टीकोन ठेवल्यास पाच कोटी रूपयांचा निधी अल्पव्याजदराने उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही सुंदरराव मोरे महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी सांगता समारंभ आणि वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटक विधानपरिषद सदस्य आ.प्रवीण दरेकर यांनी दिली.

महाड विधानसभा मतदार संघाचे आ. भरत गोगावले प्रमुख अतिथी तर माजी राजिप सदस्य अमित प्रभाकर मोरे, माजी राजिप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, संस्थेचे अध्यक्ष ऍड.संतोष काळे,उपाध्यक्ष ऍड. विनोद देशमुख, सचिव अशोक बंधू देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य व आरडीसी बँकेचे संचालक एकनाथ गायकवाड, पोलादपूरचे माजी सभापती दिलीप भागवत, महाविद्यालय विकास समितीचे माजी सदस्य प्रसन्ना पालांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आ.प्रवीणभाऊ दरेकर यांनी, आपल्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांची भूक आता बदलली आहे. केवळ दोनवेळचे जेवण नाही तर समाजामध्ये प्रतिष्ठा मिळेल, स्वावलंबनासोबत इतरांनाही रोजगार देण्याची मानसिकता असून नवनवीन उद्योगाच्या वाटा चोखाळणाऱ्या उद्योजकतेची मानसिकता वाढीस लागली आहे. भाजपच्या माध्यमातून तरूणांची हीच भूक लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध लोककल्याणकारी योजना आणल्या आहेत. आपण वेळोवेळी पोलादपूर तालुक्यातून अनेकांना रोजगार देणाऱ्या उद्योगाच्या प्रस्तावाची अपेक्षा केली असून अद्याप एकही मायका सपूत प्रस्ताव घेऊन आला नाही हे दुर्दैव आहे, अशा तीव्र भावना व्यक्त करताना आपण किती संसार उभे केले यावर आपली ओळख प्रतिष्ठा तयार होते, असे मत मांडले.

कोकण विभागामध्ये शिक्षण व सहकारी संस्थांची उभारणी आणि संस्थात्मक विकास यांचा अभाव प्रकर्षाने दिसून येतो आणि यामुळेच कोकण विभाग अनेक बाबतीत मागे असल्याचे मत व्यक्त करून रायगड जिल्ह्यातील लोकांनी विविध प्रकारचे लघुउद्योग करण्यासाठी पुढे यावे, आपण मुंबई जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून त्यांना सर्वतोपरी मदत करू असे सांगून विद्यार्थ्यांनी देखील चाकोरीबध्द शिक्षण घेण्यापेक्षा उच्च ध्येय व सातत्यपूर्ण परिश्रमाच्या आधारावर स्वत:बरोबरच स्वत:च्या गावचे नाव उज्वल करावे असे आवाहनही केले.

प्रमुख अतिथी आ. भरत गोगावले यांनी रौप्यमहोत्सवी वर्षात निमंत्रित केल्याबद्दल महाविद्यालयाचे विशेष अभिनंदन करून महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीमध्ये बहुउद्देशीय सभागृह, आधुनिक संगणक प्रयोगशाळा उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करून महाविद्यालयाला भरघोस इमारत निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

आ.गोगावले यांचे मंत्रीपदाबद्दल विधान

आ. गोगावले यांनी पोलादपूर तालुक्याचे भूमिपुत्र असणारे आ.प्रवीणभाऊ दरेकर भाजप शिवसेना युतीचे सरकार आल्यावर आम्ही दोघेही सुरूवातीपासूनच मंत्री होण्याची शक्यता असता अद्याप मंत्रीपदापासून वंचित आहोत आणि आता मंत्री होऊ की नाही, याबाबत काही सांगता येत नसल्याचे सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

प्रारंभी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ दीपक रावेरकर यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वाटचालीचे अहवाल वाचन केले. यावेळी डॉ.रावेरकर यांनी महाविद्यालयाने प्राप्त केलेले नॅक तृतीय मूल्यांकन, तसेच आयएसओ मानांकन यासह मागील शिक्षक दिनी महाविद्यालयाला प्राप्त झालेला सर्वोत्कृष्ट महाविद्यालय हा पुरस्कार महाविद्यालयाच्या गुणवत्ता पूर्ण वाटचालीची साक्ष देतात, असे सांगून यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या शिवाई शिक्षण संस्थेच्या संचालकांचे विशेष आभार मानले.

यावेळी संस्थापक व माजीमंत्री स्व.प्रभाकर मोरे यांचे पुत्र माजी राजिप सदस्य अमित मोरे यांनी कै. प्रभाकर मोरे यांनी लावलेल्या सुंदरराव मोरे नामक बीजाचे आज वटवृक्षात झालेले रूपांतर पाहण्यासाठी भाऊ हयात हवे होते,  अशा भावना व्यक्त करून कै. प्रभाकर मोरे यांनी शिवाई शिक्षण संस्थेच्या संचालकांवर सोपवलेली महाविद्यालय चालवण्याची जबाबदारी त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्यांचे मनस्वी अभिनंदन केले.

यावेळी माजी राजिप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी महाड, पोलादपूर तालुक्यातील असलेला उच्च शिक्षणाचा अनुशेष भरून काढण्यासाठी पारंपारिक महाविद्यालयाबरोबरच महाड,पोलादपूर मध्ये इंजीनियरिंग, मेडिकल यांसारख्या व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थांची आवश्यकता व्यक्त केली.

शिवाई शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. विनोद देशमुख यांनी आजच्या उच्च शैक्षणिक संस्थांमधून तयार होणारे मनुष्यबळ हे औद्योगिक व भविष्यकालीन गरजांच्या दृष्टिकोनातून तयार करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करून त्यासाठी एकविसाव्या शतकातील आधुनिक शिक्षण देणारी महाविद्यालये नवीन शैक्षणिक धोरणाच्या मदतीने तयार करण्यासाठी महाड पोलादपूरच्या लोकप्रतिनिधींनी शिक्षण संस्थांना सक्रिय सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

 बक्षीस वितरण कार्यक्रमानंतर विमल वर्षा फाउंडेशनच्या वतीने श्री विनायक मालुसरे, श्री सुभाष मालुसरे,श्री हरी शेडगे, श्री दीपक धानवे इत्यादी विश्वस्तांच्या वतीने महाविद्यालयातील स्नेहा पार्टे व साहिल मालुसरे या विद्यार्थ्यांना उच्च लॅपटॉप प्रदान करण्यात आले.

उदघाटनानंतर विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा.डॉ प्रभाकर गावंड यांनी सुंदरराव मोरे महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वाटचालीचा पोवाडा सादर केला. त्यानंतर माजी विद्यार्थी श्री ओंकार मोहिते यांनी पखवाज वादन सादर केले. उर्वरित कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी निमित्त मिमिक्री गायन ग्रुप डान्स यांसह विविध कला प्रेक्षकांसमोर सादर केल्या. उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मंगेश गोरे, प्रा. डॉ. सुधाकर जाधव, प्रा. डॉ. स्नेहल कांबळे यांनी केले.

आणखी वाचा