रत्नागिरी, दि. १४ (प्रतिनिधी): कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात आज रविवारी दुसऱ्या दिवशी ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारातील विजेत्यांचा सत्कार माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या हस्ते करण्यात आला. मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर या स्पर्धा सुरू आहेत.
या स्पर्धांसाठी विविध जिल्ह्यांतून महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले आहेत. या स्पर्धांमध्ये हे सर्व खेळाडू आपले नैपुण्य दाखवत आहेत. कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन शनिवारी क्रीडाज्योत प्रज्ज्वलित करून आणि रंगीत फुगे हवेत सोडून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते.
आज दुसऱ्या दिवशी विविध स्पर्धा उत्साहात झाल्या. त्यातील विजेत्यांना बाळासाहेब माने यांच्या हस्ते पदक, प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, ॲथलेटिक्स असोसिएशनचे संदीप तावडे यांच्यासमवेत विविध मान्यवर, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान या स्पर्धांचे बक्षीस वितरण उद्या सोमवारी करण्यात येणार आहे.








