पोलादपूर, दि. १४ (शैलेश पालकर): तालुक्यातील शिवसेना भाजप युती कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्मिती करून तसेच राव मराठा समाज बांधवांमधील प्रेमभावना उचंबळून आल्यानंतर पोलादपूर तालुक्याचे भुमिपुत्र आ.प्रवीण दरेकर यांच्या पोलादपूर दौऱ्याची सांगता झाली. या दौऱ्यामध्ये आ.दरेकर यांनी अनेक विविध विकास कामांचा शुभारंभ केल्याने काही कार्यकर्त्यांना ही विकास कामे करण्याची संधीही प्राप्त झाल्याने समाजबांधवांमध्ये आ.दरेकर यांचे कौतुक होत आहे.
पोलादपूर तालुक्यातील देवपूरवाडी सभामंडपाच्या 10 लाखांच्या कामाचा शुभारंभ आ.दरेकर यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी देवपूर ग्रामस्थांनी आ.दरेकर यांच्यासमवेत भाजपचे स्थानिक नेते प्रसन्ना पालांडे, तालुकाअध्यक्ष तुकाराम केसरकर, रायगड सरचिटणीस बिपीन म्हामूणकर, महाड तालुका अध्यक्ष जयवंत दळवी तसेच शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक कार्यकर्ते जगदीश महाडीक व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत स्वागत केले.
गोळेगणी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाला अभिवादन करून आ. प्रवीण दरेकर यांनी शेकापक्षाचे सरपंच प्रकाश दळवी, प्रकाश मोरे, नरेश शेलार तसेच स्थानिक ग्रामस्थांसोबत अभिवादन करून मारूतीमंदिर ते वरची आळी काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक रस्ता करणे 20 लाख रूपये खर्चाच्या विकास कामाचे भुमिपूजन केले.
पैठण येथे उद्योजक संतोष मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आ. प्रवीण दरेकर यांनी पेव्हर ब्लॉक रस्त्याचे तसेच गणेशवाडी अंतर्गत रस्त्याचे भुमिपूजन केले. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमवेत शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यानंतर भोगाव खुर्द साईमंदिर येथे सभामंडप बांधण्याच्या 9 लाख रूपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ आ.प्रवीण दरेकर यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी पुर्वीच्या सभामंडपाच्या रूंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पोलादपूर तालुक्यातील नियोजित कोतवाल खुर्द आणि महाळुंगे येथील विकासकामांचा शुभारंभ शिमग्याच्या कालावधीमध्ये सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती प्रसन्ना पालांडे यांनी दिली. सायंकाळी पोलादपूर येथील यशवंत इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमप्रसंगी आ.दरेकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. पोलादपूर तालुक्यातील अनेक गावांमधील आप्तजनांनी आ.प्रवीणभाऊ दरेकर यांच्या भावूकभेटीने भारावल्याचे दिसून येत होते.








