पालगड, दि. १४ (वार्ताहर): रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत दापोली तालुक्यातील कोळबांद्रे केंद्राच्या हिवाळी क्रीडास्पर्धा नुकत्याच कोळबांद्रे गावातील एक शिक्षकी शाळा असणाऱ्या कोळबांद्रे कुंभारवाडी शाळेच्या क्रीडानगरीत पार पडल्या.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे शाळेचा पट मर्यादित तसेच शाळेत एकच शिक्षक परंतू कोळबांद्रे कुंभारवाडी ग्रामस्थ मंडळाने या स्पर्धेचा संपूर्ण भार उचलला. मुख्याध्यापक मंगेश कडवईकर यांचे निटनेटके नियोजन व केंद्रातील सर्व शाळांचे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, पालक वर्ग, माजी विद्यार्थी यांची लाभलेली साथ. यामुळे या स्पर्धा यशस्वी झाल्या.
या स्पर्धांचे उद्घाटन गावतळे प्रभागाचे विस्तार अधिकारी बळीराम राठोड,केंद्रप्रमुख संजय जंगम, सरपंच रघुनाथ गुरव, ग्राम विकास अध्यक्ष शांताराम मोहिते, कार्याध्यक्ष कृष्णा बेर्डे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदिप पादड,पोलिस पाटील मंदार जुवेकर,आदर्श पतपेढीचे बाळकृष्ण काष्टे यांच्या उपस्थितीत पार पडले. क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बळवंतराव साहेब यांनी भेट देऊन सर्व खेळाडूंना खेळाचे महत्त्व पटवून दिले. तसेच ग्रामस्थांचे व शिक्षकांचे कौतुक केले.
या स्पर्धेत कोळबांद्रे नं.१ शाळेने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. वैयक्तिक स्पर्धेत कोळबांद्रे नं.१, साखळोली नं .१, साखळोली शिवाजीनगर, सडवे नं.१, सडवे सुतारवाडी, गावतळे, कोळबांद्रे बेजेवाडी शाळेतील खेळाडूंनी सुयश संपादन केले.संपूर्ण क्रीडा स्पर्धेचे सुत्रसंचलन साखळोली शिवाजी नगर शाळेचे महेंद्र कलमकर यांनी केले.








