सुधागड वऱ्हाड जांभूळपाड्याची कन्या नीलम पवार चे सौदर्य स्पर्धेत दैदिप्यमान यश, सर्व स्थरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

पाली /बेणसे दि. 30 (धम्मशील सावंत) : रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वऱ्हाड जांभूळपाडा येथील निलम श्याम पवार हिने दि. (27) शनिवारी सायंकाळी उशिरा पार पडलेल्या वाशी मुंबई येथील “मेसमेरिक मिस इंडिया पेगिएन्ट 2024” या स्पर्धेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या स्पर्धेत पवार हिने 18 ते 30 कुमारी  वयोगटात उत्कृष्ट सादरीकरण करीत फस्ट रर्नर अप चा मानाचा ‘किताब जिंकला असून सुधागड व रायगड  जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्थरातून  कौतुकाचा वर्षाव होतोय.
नीलम पवार चे शिक्षण पाली येथील ग.बा. वडेर हायस्कुल, तसेच शेठ ज.नौ. पालीवाला महाविद्यालयात झाले असून अंगभूत कलाकौशल्य, जिद्ध, चिकाटी, महत्वाकांक्षा, परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर निलमने सौदर्य स्पर्धेत नावलौकिक मिळवले आहे. लहानपणापासून कष्ट, संघर्ष वाट्याला आला असताना त्यातूनही आपण समाज आणि राष्ट्रासाठी काही तरी नाविन्यपूर्ण करावे अशी मनोमन इच्छा बाळगून निलम पवार ने अविरत कष्ट व सराव करीत या स्पर्धेत आपली विशेष छाप उमटवली आहे. हि स्पर्धा सौंदर्य आणि त्या निगडित असणाऱ्या उद्योगाला पुन्हा एक प्रतिष्ठित असे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात यशस्वी ठरली. या स्पर्धेचा मूळ उद्देश  आजच्या आधुनिक युवती, महिलांसाठी, तिचे वय, वैवाहिक स्थिती आणि पार्श्वभूमी विचारात न घेता सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्णपणे नेतृत्व कार्यक्रम तयार करणे आहे. या स्पर्धेत  ग्लॅमर, आत्मविश्वास आणि सौंदर्य या गोष्टीना महत्व देतं, प्रत्येक स्पर्धकाला वैयक्तिक आणि व्यक्तिमत्व  विकासासाठी उत्कृष्ट अनुभव प्रदान करणारी असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. या यशानंतर  प्रतिक्रिया विचारली असता नीलम पवार म्हणाली की  या यशाने माझी जबाबदारी अधिक वाढली आहे. माझ्याकडून पुढील काळात वंचित ,गोरगरीब ,कष्टकरी मुलांसाठी शैक्षणिक सहकार्य करण्याची भूमिका आहे.  तर महिला सुरक्षा यावर देखील काम करण्याचा मानस नीलम ने व्यक्त केला. हे असे व्यासपीठ आहे ज्याठिकाणी सगळ्या महिलांसाठी आखून ठेवलेल्या सीमांना दूर करत स्वतःची एक वेगळी ओळख बनवण्याची सुवर्णसंधी प्राप्त होते .  ग्रामीण आणि शहरी भागातील युवती , महिलांना प्रगतीच्या दिशेने कूच करणारे पंख आणि बळ देण्यासाठी , आत्मविश्वास वाढविण्यासाठी  ही स्पर्धा महत्वपूर्ण ठरली असल्याचे मत यावेळी नीलम पवार यांनी मांडले.
तर या स्पर्धेचे वैविध्यपूर्ण वातावरण आणि सर्वसमावेशक संस्कृतीमुळे हि स्पर्धा इतर सगळ्या सौंदर्य स्पर्धेपेक्षा खूप वेगळी दिसून येते. ही स्पर्धा 18 ते 50 पेक्षा जास्त वयोगटातील युवती, महिलांना या अद्भुत जगात सामील होण्यासाठी आणि राज्यस्तरीय, आंतरराष्ट्रीय मंचावर आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करण्याची एक सुवर्णसंधी देणारी आहे.  “हे व्यासपीठ म्हणजे स्त्रियांसाठी एक व्यासपीठ तयार करण्याचे स्वप्न सत्यात उतरवणारे आहे.
असे उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त होत विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक , नवोदित स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले. व शुभेच्छा दिल्या.

आणखी वाचा