दिव्या शिंदेची पत्रकार परिषद : बिग बॉसवर गंभीर आरोप, महत्त्वाचे फुटेज जाणीवपूर्वक लपवले

मुंबई, दि. ११ : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वातून वादग्रस्तरीत्या बाहेर पडलेली स्पर्धक दिव्या शिंदे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. घरातून निष्कासन झाल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिव्याने बिग बॉसच्या व्यवस्थापनावर अनेक गंभीर आरोप केले. बिग बॉसच्या घरात आपल्या तब्येतीची योग्य ती काळजी घेण्यात आली नाही, महत्त्वाची फुटेज दाखवली गेली नाहीत आणि आपली बाजू प्रेक्षकांपर्यंत पोहोचू दिली नाही, असा दावा तिने केला.

पत्रकार परिषदेत दिव्या म्हणाली, “बिग बॉससाठी माझी निवड तीन बैठकीनंतर झाली होती. मी सुरुवातीलाच माझ्या आजारपणाबद्दल त्यांना स्पष्ट सांगितलं होतं. मी फिजिकली फिट नाही, मला आरामाची गरज असते, असंही सांगितलं. त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की माझी पूर्ण काळजी घेतली जाईल. पण प्रत्यक्षात मला विश्रांती मिळाली नाही. मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे मला थकवण्यात आलं.”

महत्त्वाचे फुटेज जाणीवपूर्वक दाखवले नाही

दिव्याने आरोप केला की, कन्फेशन रूममध्ये आपण शो सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण ते फुटेज दाखवण्यात आले नाही.
ती म्हणाली, “मी बिग बॉसला सांगितलं होतं की हा शो मी पुढे करू शकत नाही. माझ्या मान-सन्मानावर परिणाम होत आहे, मला सतत ‘पोक’ केलं जात आहे. म्हणून मी स्वतःहून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता. पण हे कुठेही दाखवलं नाही.”

तसेच, इतर स्पर्धकांसोबत झालेली चर्चा, ज्यामध्ये तिने आपली बाजू मांडली होती, ते संभाषणही प्रसारित करण्यात आले नाही, असा आरोप तिने केला.
“राकेश बापट, प्राजक्ता शुक्रे, ओमकार राऊत आणि करण सोनावणे यांच्याशी माझं कन्फेशन रूममध्ये जाण्याआधी बोलणं झालं होतं. राकेशने बिग बॉसला समजावण्याचाही प्रयत्न केला होता. पण हे सगळं फुटेज कापण्यात आलं,” असं दिव्याने सांगितलं.

‘धमकी’ प्रकरणावर दिव्याचं स्पष्टीकरण

धमकी प्रकरणावर स्पष्टीकरण देताना दिव्या म्हणाली, “मी जे शब्द वापरले ते चुकीचे वाटले असतील, पण माझा उद्देश कोणाला प्रत्यक्ष इजा करण्याचा नव्हता. मला मानसिक त्रास होत होता. सतत टोमणे, अपमानास्पद वागणूक यामुळे मी भावनिकरित्या अस्थिर झाले होते. मी माझा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला, पण ते चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं.”

प्राजक्ता शुक्रेने ‘शब्दांची तलवार’ हा शब्द वापरण्याचा सल्ला दिल्याचाही उल्लेख दिव्याने केला. मात्र हे संभाषणही दाखवण्यात आले नाही, असे तिने स्पष्ट केले.

बिग बॉसचा निर्णय अन्यायकारक?

दिव्याने असा आरोप केला की, तिला स्वतःची चूक सुधारण्याची संधी देण्यात आली नाही.
“माझ्यावर एकतर्फी कारवाई झाली. सदस्यांच्या सुरक्षेच्या नावाखाली मला बाहेर काढण्यात आलं. पण माझी मानसिक स्थिती, माझं म्हणणं, माझी बाजू कुणीही ऐकून घेतली नाही,” असे ती म्हणाली.

कोण आहे दिव्या शिंदे?

दिव्या सुनील शिंदे ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ती आणि ‘सरकार सेना’ या संघटनेची अध्यक्ष आहे. ती सोशल मीडियावर ‘सरकार’ या नावाने ओळखली जाते. बेधडक भाषणशैली, धारदार वक्तृत्व आणि सामाजिक विषयांवर आक्रमक भूमिका यामुळे ती प्रसिद्ध आहे. बिग बॉसच्या स्टेजवर तिने ‘जयभीम’ म्हणत महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते.

याआधी सिंहगड कॉलेजमधील विद्यार्थी आंदोलनामुळे दिव्या चर्चेत आली होती. प्रवेश नाकारल्याच्या मुद्द्यावर तिने आंदोलन केलं आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला होता. त्या आंदोलनाला यशही मिळालं होतं.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

दिव्या घरातून बाहेर पडताच तिच्या टीमकडून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यात आली आहे – “खूप काही सांगायचं आहे…” असा उल्लेख असलेली ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. दिव्याचे समर्थक तिच्या बाजूने उभे राहत असून बिग बॉसच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. तर काही प्रेक्षकांनी दिव्याच्या वागणुकीवर टीकाही केली आहे.

पुढील भूमिका काय?

पत्रकार परिषदेत दिव्याने स्पष्ट केले की, ती गप्प बसणार नाही.
“माझ्यावर अन्याय झाला आहे. मी माझी बाजू लोकांसमोर मांडणार आहे. मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, पण सत्य बाहेर येईल,” असे तिने ठामपणे सांगितले.

एकूणच, बिग बॉस मराठी ६ मधील दिव्या शिंदेचा वाद आता घराबाहेरही अधिक तीव्र होताना दिसत आहे. तिच्या आरोपांमुळे बिग बॉसच्या व्यवस्थापनावर नवे प्रश्न उपस्थित झाले असून येत्या काळात या प्रकरणावर आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

https://www.instagram.com/sarkar__611?igsh=bmFqcHIwaGp2aXR6

आणखी वाचा