दापोली, दि. २६ : कोकणात उन्हाळ्याच्या दिवसात रानमेवा हा खाण्यासाठी तयार असतो उन्हाळ्याच्या काहिलीत देत रानमेव्याची शितलता शरीराला थंडावा देते. चैत्र महिना सुरू झाला की कोकणात स्थानिक बाजारपेठांमधून कोकण मेवा दाखल होतो. असाच कोकणातील हा रानमेवा यंदाही दाखल झाला आहे. दापोली तालुक्यातील ग्रामीण भागातूनही दापोली शहरात बाजारपेठेत रानमेवा दाखल झाला आहे. हा रानमेवा विकत घेण्यासाठी बाजारपेठ परिसरात गर्दी दिसत आहे दापोली शहरातील मारुती मंदिर पूल, हॉटेल सन्मान समोरची गल्ली, एसटी स्टँड जवळ आदी ठिकाणी ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांनी हा रानमेवा दापोलीत विक्रीसाठी आणला आहे. ग्रामीण भागातून येणारे आंबे, काजू या नगदी फळांबरोबरच यामध्ये कच्ची कैरी, ओले काजूगर, करवंदे, कोकम,भोकरे, जांभळे, फणसाचे गरे, अळू, आंबा व अळूची खास केलेली उसरी आदी कोकणमेवा स्थानिक बाजारपेठेत दाखल झाला आहे.
कोकणातील रानमेव्याची आंबट गोड अशी अविट चव चाखण्यासाठी स्थानिक नागरिक व पर्यटकांनीही गर्दी केली आहे. कोकणी रान मेव्याचा हा व्यवसाय ग्रामीण भागातील शेतकरी महिला, पुरुष हे गेले कित्येक वर्ष करीत आहेत. रानावनातून डोंगरांमधून फिरून हा रानमेवा बाजारपेठेत आणला जातो. कोकणातील या रानमेव्याची खास चव नागरिकांना पर्यटकांना मिळावी यासाठी ऐन उन्हामध्येही डोक्यावर छत्री धरून हा कोकणातील रानमेवा विक्रीसाठी आणण्यात आला आहे.
मात्र अलीकडे कोकणात विकासाच्या नावाखाली डोंगर खोदणे, झाडे झुडप व रान तोडून वनसंपदा नष्ट करण्याचे प्रकार वाढल्याने करवंदा बरोबरच अन्य रानमेव्यावरही या सगळ्याचा उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याची प्रतिक्रिया कोकणातल्या ग्रामीण भागातील रानमेवा व्यावसायिक जेष्ठ महिला रुक्मिणी जोशी यांनी दिली.
वडाच्या अथवा कुडाच्या झाडाच्या पानावर हा रानमेवा विक्रीसाठी स्थानिक बाजारपेठांमधून दाखल झाला आहे. रानमेवा विक्रीचा पारंपरिक व्यवसाय आजही जपला जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसात उपलब्ध होणारा हा रानमेवा घेण्यासाठी कोकणातील स्थानिक बाजारपेठांमधून पर्यटकांनी गर्दी केली आहे. कोकणातील रानमेवा रानात त्याची झाडे झुडपे टिकवून ठेवत त्याचा आस्वाद हा थेट पर्यटकांना येथील नागरिकांना मिळावा यासाठी हा पारंपारिक व्यवसाय करणारे कोकणातील ग्रामीण भागातील महिला व शेतकरी यांचे मोठे योगदान असल्याची प्रतिक्रिया लाडघर येथील पर्यटन व्यवसायिक सचिन मयेकर यांनी दिली.








