रत्नागिरी, दि. २५ : कोकणातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी, तसेच येथून जास्तीत जास्त खेळाडूंनी ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करावे, यासाठी मुंबई विद्यापीठाच्या किमान ५ ते १० क्रीडा स्पर्धा कोकणात आयोजित व्हायला हव्यात, असे प्रतिपादन विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांनी केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन डॉ. रेड्डी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. विद्यापीठात दरवर्षी सुमारे ४० प्रकारच्या क्रीडा स्पर्धा होतात. यंदापासून उत्कृष्ट पुरुष व महिला खेळाडूंची निवड करण्यासह क्रीडा विकासासाठी विशेष तरतुदी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
तायक्वांदो हा शिस्त, आत्मविश्वास आणि आत्मसंरक्षण शिकवणारा खेळ आहे. या खेळात भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विद्यापीठाचा खेळाडू शुभम शेट्टी याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतला असून, त्याला विद्यापीठाने अडीच लाख रुपयांचे अनुदान दिले होते. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी यापुढेही आर्थिक सहकार्य केले जाईल, असे रेड्डी यांनी स्पष्ट केले. यावेळी शुभम शेट्टीचा सन्मान करण्यात आला.
स्पर्धांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून, आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच नियुक्त केले जात आहेत. खेळाडूंचे वजन आणि स्पर्धांचे वेळापत्रक पारदर्शक पद्धतीने निश्चित केले जाते, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात जिमखाना विभागप्रमुख डॉ. चंद्रशेखर केळकर यांनी तायक्वांदोमुळे शिस्त, एकाग्रता, संयम आणि आत्मनियंत्रण विकसित होत असल्याचे सांगितले. खेळामुळे शारीरिक क्षमतेसोबत मानसिक संतुलन आणि उत्तम आरोग्य लाभते. विजय आणि पराभव हा खेळाचा भाग असून, पराभवातून चुका सुधारण्याची संधी मिळते, असे त्यांनी नमूद केले.
प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीची माहिती दिली. या स्पर्धेत ५१ महाविद्यालयांतील १०० पुरुष आणि १०० महिला खेळाडूंनी सहभाग घेतला असून, चार दिवस स्पर्धा चालणार आहेत. येथून निवड झालेले खेळाडू राजस्थान आणि नोएडा येथे होणाऱ्या अखिल भारतीय तायक्वांदो स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील.
यावेळी डॉ. विश्वंभर जाधव, डॉ. आदित्य कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील, व्यंकटेशराव कररा, डॉ. विवेक भिडे, डॉ. सीमा कदम, डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. विनोद शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रा. मृदुला जोशी यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. विनोद शिंदे यांनी आभार मानले.
मोबाईलऐवजी मुलांनी मैदानावर यावे!
विद्यार्थ्यांनी मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा मैदानावर येऊन प्रत्यक्ष खेळात सहभागी व्हावे. त्यामुळे त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होण्यासोबत अभ्यासातील कामगिरीही सुधारू शकते. शालेय जीवनापासून क्रीडा संस्कृती रुजवून कोकणातील खेळाडूंना आशियाई क्रीडा स्पर्धा आणि ऑलिंपिकपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही डॉ. मनोज रेड्डी यांनी दिली.








