पराग विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका सायली राणे यांना आदर्श महापौर शिक्षक पुरस्कार

३२ वर्षांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल; गुणवंत शिक्षक म्हणून गौरव

चिपळूण, दि. २५ : भांडुप येथील पराग विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राथमिक विभागातील सहाय्यक शिक्षिका सायली राणे यांना आदर्श महापौर शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या ३२ वर्षांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पेंग्विन सभागृहात आयोजित सोहळ्यात मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या हस्ते मुंबईतील ५० गुणवंत शिक्षकांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक दत्तात्रय वारे यांच्या हस्तेही सायली राणे यांचा सन्मान करण्यात आला. पुरस्कारांतर्गत ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व फेटा देण्यात आला.

राणे या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश आणि शुल्कासाठी मदत करतात. गृहभेटींद्वारे पालकांशी संवाद साधून शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात.

तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, शैक्षणिक व्हिडिओ व पीपीटी निर्मिती आणि शाळेच्या गुणवत्ता विकासातील योगदानासाठीही त्या परिचित आहेत. २०२३-२४ मध्ये त्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला होता. २०२३ मधील तालुकास्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत त्यांनी द्वितीय क्रमांक मिळविला होता.

त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

आणखी वाचा