चिपळूण, दि. २५ : राधाई फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘नवदुर्गा सन्मान पुरस्कार २०२६’ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून सामाजिक योगदान देणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणे, त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे आणि समाजातील योगदानाची दखल घेणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी आणि स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाचा गौरव अशा विविध पैलूंचा संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला. समाजाच्या उभारणीत महिलांचे योगदान मोलाचे असून, त्यांच्या कार्याची योग्य दखल घेतल्यास इतर महिलांनाही सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळते. अशा उपक्रमांमुळे कर्तृत्ववान महिलांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच त्यांच्या कार्याला व्यापक व्यासपीठ उपलब्ध होते.
या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण विभागाच्या संरक्षण अधिकारी माधवी जाधव, रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य महिला उपाध्यक्ष पूजा निकम, खेड नगर परिषदेच्या नगरसेविका वैभवी खेडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सरचिटणीस दिशा दाभोळकर, भाजप महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा चव्हाण, श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थान, लोटेच्या संचालिका जयश्री कोकरे आणि राधाई फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा राधा लवेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, महिला पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
‘नवदुर्गा सन्मान पुरस्कार’ उपक्रमातून महिलांच्या कार्याचा गौरव करून समाजात महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला. महिलांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देणारे असे उपक्रम सामाजिक परिवर्तनासाठी महत्त्वपूर्ण ठरतात.








