चिपळूण, दि. २६ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रिमंडळात संभाव्य फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांना मंत्रिपदाची संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार जोशी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रीय सरचिटणीस पार्थ पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे मागणी केली आहे.
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याच्या चर्चांमुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील अनुभवी नेतृत्व असलेल्या आमदार शेखर निकम यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी भूमिका जोशी यांनी मांडली आहे.
आमदार निकम यांना शिक्षण क्षेत्राची जाण असून, गोरगरीब जनतेच्या प्रश्नांसाठी आणि चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाच्या विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या अनुभवाचा राज्याच्या विकासासाठी उपयोग व्हावा, यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्या नावाचा सकारात्मक विचार करावा, असे आवाहन जोशी यांनी केले आहे.
अनिलकुमार जोशी यांनी महाराष्ट्र राज्य हिंदी महामंडळाचे अध्यक्षपदही भूषविले आहे. त्यांच्या या मागणीला रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सदस्यांचा पाठिंबा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळावे आणि आमदार शेखर निकम यांना राज्याच्या कारभारात काम करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा या मागणीद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.








