कोकणात प्रथमच जिल्हा परिषद शाळांत व्हीआर लॅब; अंगणवाड्यांत थ्रीडी-एआय शिक्षण!

आमदार शेखर निकम यांचा १.६० कोटींचा शैक्षणिक उपक्रम; चिपळूण-संगमेश्वरमधील १० शाळा, ५० अंगणवाड्यांना लाभ

चिपळूण, प्रतिनिधी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात १ कोटी ६० लाख रुपयांचा नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहे. कोयना भूकंप निधीतून १० जिल्हा परिषद शाळांमध्ये व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) लॅब, तर ५० अंगणवाड्यांमध्ये थ्रीडी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आमदार शेखर निकम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचा शुभारंभ सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेत करण्यात आला.

या उपक्रमात चिपळूण तालुक्यातील पाच शाळा आणि २५ अंगणवाड्या, तर संगमेश्वर तालुक्यातील पाच शाळा आणि २५ अंगणवाड्यांचा समावेश आहे.

आधुनिक तंत्रज्ञानातून अनुभवाधारित शिक्षण

या उपक्रमामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना विज्ञान, भूगोल, अवकाश आणि मानवी शरीर यांसारख्या विषयांचा आभासी अनुभव घेता येणार आहे. व्हीआर हेडसेट, संगणकीय यंत्रणा आणि शैक्षणिक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अवघड संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल.

अंगणवाड्यांमधील बालकांना थ्रीडी मॉडेल्स, डिजिटल चित्रे, ध्वनी, बालगीते आणि परस्परसंवादी शैक्षणिक साधनांच्या माध्यमातून रंग, आकार, अक्षरे, अंक आणि विविध संकल्पना शिकता येतील. यामुळे लहान वयातच मुलांची आकलनक्षमता आणि शिकण्याची आवड वाढण्यास मदत होणार आहे.

आमदार शेखर निकम म्हणाले की, ग्रामीण भागातील प्रत्येक मुलाला आधुनिक शैक्षणिक सुविधा मिळाव्यात आणि त्याच्या क्षमतेनुसार प्रगतीची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. बदलत्या शिक्षणपद्धतीत अनुभवातून शिकणे महत्त्वाचे असून, विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आवश्यक आहे.

जिल्हाभर विस्ताराचे प्रयत्न

या उपक्रमाची जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाहणी करणार आहेत. त्यानंतर जिल्हा नियोजन निधीतून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे निकम यांनी सांगितले.

गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनाक यांनी या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमात आमदार निकम यांच्या हस्ते संबंधित शाळा आणि अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधी, शिक्षण विभागाचे अधिकारी, शिक्षक आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

आणखी वाचा