रत्नागिरी, दि. २६ : कारागृहातील बंद्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन आणि आर्थिक स्वावलंबन साध्य करण्याच्या उद्देशाने फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांच्या सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशन यांच्या पुढाकाराने रत्नागिरी जिल्हा कारागृहात प्लंबिंग कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या ८० दिवसीय प्रशिक्षणात सहभागी झालेल्या २५ बंद्यांना २३ ऑक्टोबर रोजी स्किल इंडिया प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात १५ जून २०२६ रोजी झाली होती. एकूण २९ बंद्यांनी यासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २५ जणांनी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. जन शिक्षण संस्थान, रत्नागिरी आणि जिल्हा कारागृह प्रशासनाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
बंद्यांना प्लंबिंगचे व्यावहारिक ज्ञान आणि कौशल्य मिळवून देणे, तसेच कारागृहातून मुक्त झाल्यानंतर रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
प्रमाणपत्र वितरण समारंभाला रत्नागिरी जिल्हा कारागृहाचे अधीक्षक सचिन पाटील, जन शिक्षण संस्थानचे अध्यक्ष तथा गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू, निधी सावंत, अमृता शेट्ये आणि प्रशिक्षण प्रशिक्षक भिकाजी नाटेकर उपस्थित होते.
फिनोलेक्स इंडस्ट्रीजतर्फे वरिष्ठ महाव्यवस्थापक एस. रविंद्रन, प्लांट एचआर प्रमुख नंदकिशोर शिंपी आणि सीएसआर अधिकारी शामराव निंबाळकर यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या बंद्यांनी कारागृह प्रशासनाचे आभार मानले. या प्रशिक्षणामुळे नवीन कौशल्य आत्मसात करता आले असून, मुक्ततेनंतर रोजगार मिळविण्यासाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बंद्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने पुन्हा सामावून घेण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशन, जन शिक्षण संस्थान आणि कारागृह प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून सामाजिक पुनर्वसनाला चालना मिळत आहे.








