रत्नागिरी, दि. १४ :- ग्रामीण, कृषी व सहकार या विषयावरील साहित्य संमेलनामध्ये उद्या दि. १५ फेब्रुवारी रोजी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. ही मुलाखत सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत होणार आहे.
या प्रकट मुलाखतीचे सूत्रसंचालन दै. सकाळचे माजी संपादक यमाजी मालकर करणार असून, शेती, ग्रामीण विकास व सहकार क्षेत्रातील अनुभव, वाटचाल आणि भविष्यातील दिशा यावर सखोल संवाद साधला जाणार आहे.
या संमेलनामध्ये दिवसभर विविध परिसंवादांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व अभ्यासक आपले विचार मांडणार आहेत. शेती व सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी सकाळी ९.०० वाजल्यापासून पूर्ण दिवस उपस्थित राहून विविध परिसंवादांचा व प्रकट मुलाखतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामुळे ग्रामीण, कृषी व सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मिळणार असून, विचारांची देवाणघेवाण घडून येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.







