मुंबई, दि. १७ फेब्रुवारी : दादांच्या विमान अपघाताची सखोल आणि निष्पक्ष चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज सादर करण्यात आले. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.
आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यामध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा नेते पार्थ पवार उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाबाबत उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी राज्य सरकारकडून पत्रव्यवहार करण्यात येईल व सीबीआय चौकशीच्या दृष्टीने आवश्यक पावले उचलली जातील, असे आश्वासन दिल्याची माहिती सुनिल तटकरे यांनी दिली.
निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे
निवेदनात अपघाताबाबत गंभीर अनियमितता व संशयास्पद बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये पुढील मुद्द्यांचा समावेश आहे :
अ) उड्डाण क्रूच्या रचनेत शेवटच्या क्षणी करण्यात आलेले बदल आणि त्यासंदर्भातील अधिकृततेची तपासणी आवश्यक आहे.
ब) हवाई वाहतूक नियंत्रण संप्रेषण आणि धावपट्टी मंजुरीच्या क्रमवारीतील स्पष्ट विसंगती.
क) ऑनबोर्ड सुरक्षा चेतावणी प्रणालींच्या कार्यप्रणालीबाबत गंभीर शंका.
ड) लँडिंगच्या टप्प्याच्या जवळ असूनही कोणतेही संकट संदेश नोंदवले गेले नसणे.
ई) क्रू फिटनेस, देखभाल, नियमपालन आणि विमान प्रणालींसंदर्भात फॉरेन्सिक तपासाची गरज.
घटनेच्या दिवशी संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री उपस्थित होते. यापूर्वी अशा घटनांसाठी स्वायत्त यंत्रणा नेमून तपास करण्यात आला आहे. सध्या सीआयडीमार्फत चौकशी सुरू असली तरी सीबीआय चौकशी झाल्यास अधिक व्यापक आणि पारदर्शक तपास होऊ शकतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मत असल्याचे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणातील सर्व मुद्द्यांचा सखोल तपास करून निष्कर्ष राज्यातीलच नव्हे तर देशातील जनतेसमोर लवकरात लवकर मांडण्यात यावेत, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे.
महायुती संदर्भात चर्चा
दरम्यान, राज्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती म्हणून पुढील वाटचाल कशी करावी, याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याशी चर्चा झाल्याची माहितीही सुनिल तटकरे यांनी दिली. ही चर्चा सौहार्दपूर्ण व समाधानकारक झाली असून भाजप हा एनडीएतील प्रमुख पक्ष असल्याने मित्रपक्षांचा सन्मान राखूनच ही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याशीही प्रदेश कार्यालयात स्वतंत्र बैठक झाली असल्याचे तटकरे यांनी नमूद केले.
पक्षातील नाराजीच्या बातम्यांचे खंडन
पक्षाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत आमदारांच्या नाराजीबाबत कोणतीही चर्चा झाली नसून या सर्व बातम्या कपोलकल्पित असल्याचे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधीमंडळात व राज्यात एकसंघपणे, संयमाने आणि ठाम भूमिका घेत काम करत असून उपमुख्यमंत्री पदावरून संघटनेची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या नेतृत्त्वावर विश्वास व्यक्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्याचा निर्णय बैठकीत झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले.







