‘अंनिस’च्या पुढाकाराने जातपंचायत बरखास्त, आंतरजातीय विवाह केलेल्या महिलेला न्याय; पाच वर्षांच्या लढ्याला यश

नाशिक, दि. २० : नंदुरबार जिल्ह्यातील चित्रकथी समाजातील एका महिलेला आंतरजातीय विवाह केल्यामुळे समाजातून बहिष्कृत करण्यात आले होते. गेल्या पाच वर्षांपासून तिला माहेरी तसेच समाजातील कोणत्याही धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास मनाई होती. अखेर या अन्यायाविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) यांच्या पुढाकाराने जातपंचायत बरखास्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून संबंधित महिलेला न्याय मिळाला आहे.

या प्रकरणात अंनिसने पुढाकार घेत राज्यभरातील चित्रकथी तसेच भटके-विमुक्त समाजातील प्रतिनिधींची बैठक आयोजित केली. या बैठकीत समाजप्रबोधन करण्यात आले आणि जातपंचायतीच्या अमानवी निर्णयांवर सखोल चर्चा झाली. अखेर सर्वानुमते जातपंचायत बरखास्त करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यासोबतच आंतरजातीय विवाहास मान्यता देणे, बालविवाहास बंदी घालणे, समाजातून वाळीत टाकणे तसेच आर्थिक दंड आकारण्यास प्रतिबंध घालण्याचा निर्णयही घेण्यात आला.

पीडित महिला मनीषा अहिरे-अटक यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्वचेच्या आजारामुळे समाजात तिच्याबद्दल अपमानास्पद चर्चा होत होत्या आणि जबरदस्तीने अयोग्य स्थळे दाखवली जात होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने आंतरजातीय विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर समाजाने तिला व तिच्या कुटुंबाला बहिष्कृत केले. तब्बल पाच वर्षे हा अन्याय सहन केल्यानंतर अंनिसच्या मदतीने तिला अखेर न्याय मिळाला.

या निर्णयामुळे तिला पुढील आठवड्यात होणाऱ्या भावाच्या लग्नात सहभागी होता येणार आहे. त्यामुळे तिने आनंद व्यक्त केला आहे. अंनिसचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले की, भटके-विमुक्त समाजातील कुप्रथा आणि अंधश्रद्धांविरोधात एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

चित्रकथी समाजाचे पदाधिकारी जगदीश चित्रकथी यांनी ‘जातपंचायत मुठमाती’ अभियानाला पाठिंबा दर्शवत, समाजात पुरोगामी विचार रुजवण्यासाठी पुढील काळात व्यापक समाजप्रबोधन राबवले जाईल, असे स्पष्ट केले.

आणखी वाचा