एसटी महामंडळाच्या ताफ्यात 8 हजार 300 नवीन बसेस दाखल होणार; दैनंदिन तोट्यातून सावरण्याचा सरकारचा प्रयत्न

मुंबई, दि. २० : सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या वर्षभरात एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल 8 हजार 300 नवीन बसेस दाखल केल्या जाणार असून यामुळे दैनंदिन तोट्यातून एसटीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

सध्या एसटी महामंडळाचा दैनंदिन खर्च सुमारे 34 ते 35 कोटी रुपये इतका असून उत्पन्न जवळपास 33 कोटी रुपये आहे. त्यामुळे दररोज 1 ते 1.5 कोटी रुपयांची तूट सहन करावी लागत आहे. “एसटीच्या उत्पन्नवाढीतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे बसेसची कमतरता आहे. बसेस वाढल्या तर प्रवासी वाढतील आणि उत्पन्नात आपोआप वाढ होईल. वर्षअखेरपर्यंत एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

पहिल्या टप्प्यात 8,300 बसेस

एसटीच्या दीर्घकालीन धोरणानुसार पुढील काही वर्षांत 20 ते 25 हजार नवीन बसेस खरेदी करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. याला राज्य शासनाची तत्वतः मान्यता मिळाली आहे. यंदा पहिल्या टप्प्यात 8 हजार 300 बसेस ताफ्यात दाखल होणार आहेत.

यामध्ये 3,000 ‘3×2’ आसन रचनेच्या आणि 55 आसन क्षमतेच्या बसेस मार्चपासून टप्प्याटप्प्याने दाखल होतील. या बसेसना ‘राजमाता जिजाऊ’ हे नाव देण्यात आले असून त्या दोन शहरांदरम्यानच्या गर्दीच्या मार्गांवर धावतील. याशिवाय 5,000 साध्या बसेसची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

दुर्गम व आदिवासी भागांसाठी 100 मिडी बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. खासगी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी 200 अत्याधुनिक, आरामदायी बसेसही ताफ्यात दाखल केल्या जातील. या सर्व बसेस उपलब्ध झाल्यानंतर दररोज 70 ते 75 लाख प्रवासी वाहतुकीचे लक्ष्य गाठण्याचा एसटी महामंडळाचा मानस आहे.

खर्च-उत्पन्नाचा ताळमेळ महत्त्वाचा

“ग्रामीण भागातील मुक्कामी फेऱ्या वाढवणे, आदिवासी पाड्यांपर्यंत सेवा पोहोचवणे आणि शहरांदरम्यान अतिरिक्त गाड्या सुरू करणे यामुळे एसटीची पकड पुन्हा मजबूत होईल. एसटी ही नफा कमावणारी संस्था नसून सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. मात्र खर्च-उत्पन्नाचा ताळमेळ साधणे आवश्यक आहे. वर्षअखेरपर्यंत एसटी आर्थिक गर्तेतून बाहेर येईल,” असा विश्वास परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केला.

बसेसची संख्या घटली

कोरोना महामारीपूर्वी एसटीकडे 18 ते 19 हजार बसेस होत्या आणि त्यामधून दररोज सुमारे 66 लाख प्रवासी प्रवास करत होते. मात्र कोरोना काळात आणि कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन संपामुळे बस खरेदी ठप्प झाली. परिणामी 2024 अखेर बसेसची संख्या सुमारे 12 हजार 600 पर्यंत घसरली.

दरम्यान, राज्य शासनाने महिलांना 50 टक्के सवलत आणि 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची योजना लागू केल्यानंतर प्रवाशांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. सध्या दररोज सुमारे 50 लाख प्रवासी एसटीने प्रवास करत आहेत. मात्र अनेक मार्गांवर फेऱ्या अपुऱ्या पडत असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी डिजिटल पाऊल

प्रवाशांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी एसटी महामंडळाने 111 कोटी रुपयांचा डिजिटल सुरक्षा प्रकल्प हाती घेतला आहे. राज्यातील 633 महत्त्वाच्या ठिकाणी – बसस्थानके, आगार, विभागीय कार्यालये व कार्यशाळांमध्ये एकूण 7,035 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत.

पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागांतील 64 संवेदनशील ठिकाणी कॅमेरे बसवले जातील. मुंबई येथे उभारण्यात आलेल्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून राज्यभरातील हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी Telecommunications Consultants India Limited या संस्थेमार्फत केली जात आहे.

महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या मते, डिजिटल सुरक्षेमुळे प्रवाशांमध्ये विश्वास वाढेल तसेच चोरी, छेडछाड व इतर गुन्हेगारी घटनांवर आळा बसेल. एकीकडे नवीन बसेसचा मोठा ताफा आणि दुसरीकडे आधुनिक सुरक्षा व्यवस्था उभी राहत असल्याने एसटी महामंडळ पुन्हा सक्षम होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

आणखी वाचा