RATNAGIRI : कडाक्याच्या उन्हामुळे शाळांना सुट्ट्या लागल्या असून कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात वेळ घालवण्यासाठी पर्यटकांनी रत्नागिरी जिल्ह्याकडे धाव घेतली आहे. स्वच्छ समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि अध्यात्मिक केंद्रांनी नटलेली रत्नागिरी सध्या पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेली आहे. जर तुम्हीही रत्नागिरीला येण्याचा विचार करत असाल, तर ही पाच ठिकाणे तुमच्या भेटीसाठी सर्वोत्तम ठरतील.
१. गणपतीपुळे – निसर्ग आणि अध्यात्माचा संगम
रत्नागिरीतील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणजे गणपतीपुळे. येथील ४०० वर्षे जुने स्वयंभू गणपती मंदिर आणि त्याला लागून असलेला पांढऱ्या वाळूचा समुद्रकिनारा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.
वैशिष्ट्ये: वॉटर स्पोर्ट्स, ‘प्राचीन कोकण’ संग्रहालय, मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक.
कसे जावे?
रत्नागिरी शहरापासून हे ठिकाण सुमारे २५ किमी अंतरावर आहे.
रत्नागिरी बसस्थानकावरून दर १५-२० मिनिटांनी गणपतीपुळेसाठी एसटी बसेस उपलब्ध आहेत. खाजगी रिक्षा किंवा टॅक्सीनेही जाता येते.
२. रत्नदुर्ग किल्ला आणि भगवती मंदिर
रत्नागिरी शहरातच असलेला हा किल्ला तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. किल्ल्याच्या तटबंदीवरून अरबी समुद्राचे विहंगम दृश्य दिसते.
वैशिष्ट्ये: किल्ल्यातील श्री भगवती मंदिर, किल्ल्याची ऐतिहासिक तटबंदी आणि दीपगृह
कसे जावे?
रत्नागिरी शहराच्या मुख्य बसस्थानकापासून हा किल्ला केवळ ४ किमी अंतरावर आहे.
शहर बस किंवा रिक्षाने तुम्ही अवघ्या १०-१५ मिनिटांत येथे पोहोचू शकता.
३. आरे-वारे समुद्रकिनारा
रत्नागिरी ते गणपतीपुळे दरम्यानचा हा किनारा ‘कोस्टल हायवे’वर स्थित आहे. निळे पाणी आणि चंदेरी वाळूमुळे याला ‘मिनी गोवा’ असेही म्हटले जाते.
वैशिष्ट्ये: फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम स्पॉट, शांत वातावरण आणि निसर्गरम्य घाट.
कसे जावे?
रत्नागिरी आणि गणपतीपुळेला जोडणाऱ्या रस्त्यावरच हे किनारे लागतात.
खाजगी वाहनाने जाणे अधिक सोयीचे पडते जेणेकरून तुम्ही घाटातील ‘व्ह्यू पॉईंट्स’चा आनंद घेऊ शकाल.
४. थिबा पॅलेस – ऐतिहासिक वारसा
म्यानमारच्या राजाला इंग्रजांनी जेथे नजरकैदेत ठेवले होते, तो ऐतिहासिक थिबा पॅलेस रत्नागिरीच्या एका उंच टेकडीवर आहे.
वैशिष्ट्ये: राजवाड्याची लाकडी कोरीव काम केलेली वास्तुकला, संग्रहालय आणि जवळच असलेला ‘जिजामाता उद्यान’ (थिबा पॉईंट), जिथून सूर्यास्त अतिशय सुंदर दिसतो.
कसे जावे?
रत्नागिरी रेल्वे स्थानकापासून जवळच (सुमारे ५ किमी) आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने रिक्षाने सहज पोहोचता येते.
५. जयगड किल्ला आणि दीपगृह
शास्त्री नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर हा किल्ला उभा आहे. किल्ल्याजवळच असलेले ऐतिहासिक दीपगृह पर्यटकांचे खास आकर्षण आहे.
वैशिष्ट्ये: किल्ल्याचे बुरूज, ऐतिहासिक विहीर आणि संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत पर्यकांसाठी खुले असणारे जयगड दीपगृह.
कसे जावे?
गणपतीपुळेपासून सुमारे २० किमी आणि रत्नागिरी शहरापासून ४२ किमी अंतरावर आहे.
गणपतीपुळे किंवा रत्नागिरीतून एसटी बस किंवा टॅक्सी उपलब्ध आहेत.
पर्यटकांसाठी टीप: उन्हाळ्यामुळे दुपारी ११ ते ४ या वेळेत फिरणे टाळून सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सहलीचा आनंद घ्यावा. कोकणी खाद्यपदार्थांचा आणि रसाळ हापूस आंब्याचा आस्वाद घ्यायला विसरू नका.
– शिवम जाधव








