बारावीचा निकाल 2 मे रोजी जाहीर; दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन उपलब्ध

पुणे, दि. ३० मे : राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आता जवळ आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा निकाल शनिवार, 2 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षण मंडळ कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे निकाल लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात होती; मात्र अखेर मंडळाने निकालाची अधिकृत तारीख जाहीर केल्याने विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर झाला आहे.

राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांना आपले गुण खालील अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहेत:

विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण ऑनलाईन पाहता येतील तसेच निकालाची प्रिंट काढण्याची सुविधाही उपलब्ध असेल. याशिवाय DigiLocker अॅपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या विद्यार्थ्यांचा एकत्रित निकाल ‘college login’ द्वारे पाहता येणार आहे.

गुणपडताळणी व पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज

निकालानंतर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांबाबत शंका असेल, त्यांच्यासाठी मंडळाने गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

  • अर्ज कालावधी : 3 मे ते 17 मे 2026
  • अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असेल.
  • शुल्क भरण्यासाठी Debit Card, Credit Card, UPI आणि Net Bankingचा वापर करता येईल.

पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्यानंतर 5 कार्यदिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा लागेल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

श्रेणी सुधार योजना व पुरवणी परीक्षा

बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी श्रेणी/गुणसुधार योजनेअंतर्गत तीन संधी उपलब्ध राहणार आहेत —

  • जून-जुलै 2026
  • फेब्रुवारी-मार्च 2027
  • जून-जुलै 2027

तसेच जून-जुलै 2026 मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया स्वतंत्र परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात येणार आहे.

राज्यभरात 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा

यंदाची बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण 15,32,487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8,20,229 मुलगे, 7,12,240 मुली आणि 18 ट्रान्सजेंडर विद्यार्थी सहभागी होते. राज्यभरातील 10,664 कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, परीक्षेसाठी 3,387 केंद्रे निश्चित करण्यात आली होती.

दरम्यान, निकाल जाहीर होताच संकेतस्थळांवर ताण येण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांनी संयम राखून अधिकृत वेबसाइट्सवरूनच निकाल पाहावा, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

आणखी वाचा