पाली/बेणसे, दि. ०७ (धम्मशील सावंत): रायगड लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे निवडणूक रिंगणात आहेत. सुनिल तटकरे यांच्यावर अनंत गीते हे प्रत्येक सडकून टीका करीत आहेत. ज्या बॅरिस्टर अंतुले यांनी राजकीय जन्म दिला, त्या अंतुले साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्या शरद पवार साहेबांनी मान, सन्मान, प्रतिष्ठा, मंत्रीपदे, आमदारकी खासदारगी एवढ सगळं दिलं त्यांच्या पाठीतही खंजीर खुपसला, 2019 ला मी तटकरेंना हद्दपार करणार होतो, मात्र ज्या जयंत पाटीलांनी त्यांची हद्दपारी वाचवली त्या जयंत पाटीलांच्या पाठीतही खंजीर खुपसला, त्यांना पाठिंबा देणाऱ्या मधुकर पाटीलांच्या पाठीत खंजिर खुपसला. जे या कुणाचेच राहिले नाहीत ते तुमचे, जनतेचे काय राहणार अस घणाघाती टीकास्त्र अनंत गीते यांनी परळी सुधागड येथील शनिवारी दि. (06) सायंकाळी झालेल्या प्रचार सभेत सुनिल तटकरे यांच्यावर सोडले. अनंत गीते पुढे म्हणाले की रायगडची लोकसभा निवडणूक ही भ्रष्टाचार विरुद्ध सदाचार अशी आहे. मागील वेळेला दुर्दैवाने सदाचाराचा पराभव झाला, याच शल्य माझ्यापेक्षा जास्त जनतेच्या मनात आहे.
ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी आहे. संविधान लोकशाही वाचविण्यासाठीची ही निवडणूक आहे. या देशात वन नेशन वन पार्टी आणू पाहतात, या देशात हुकूमशाही येऊ देणार नाही, याकरिता मतभेद, विसरून इंडिया आघाडी स्थापन झाली आहे. या निवडणुकीत भाजप सत्तेत आला तर 2024 नंतर निवडणुकाच होणार नाही, अशी भीती गीते यांनी व्यक्त करताना ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. असे सांगितले. प्रत्येक सभेत माझे उत्स्फूर्त स्वागत व प्रतिसाद होतोय. मुस्लिम समाज माझ्या खंबीरपणे पाठीशी उभा आहे. एका सभेत फोटो काढण्यासाठी मंचावर आलेल्या मुस्लिम बांधवाने “गीते साहब रायगडमे आपकी त्सुनामी आणे वाली है” अस ठणकावून सांगितलं असल्याची आठवण गीतेंनी करून दिली. त्या त्सुनामीत हे गटांगळ्या खात जातील असे गीते म्हणाले. हा रायगड आहे. तटकरे यांचा आता कडेलोट करायचा आहे. सर्व समाज घटक , विविध संघटना आपल्यासाठी काम करतात. मणिपूर च्या हिंसाचारामुळे आणि पंतप्रधान यावर गप्प बसल्यामुळे देशातील आदिवासी बांधव अस्वस्थ , नाराज आहे. भाजपचे सरकार असून एक शब्द बोलत नाहीत. या देशात कुणी सुरक्षित नाही, बेरोजगारी वाढली आहे, महागाई चा आगडोंब उसळला आहे. फसव्या जाहिरातीला आपण भुलतो, आता येथील तरुण इंडिया आघाडीलाच मतदान करणार असल्याचा विश्वास आहे.
भाजप सरकार गोरगरिबांची फसवणूक चेष्टा करीत आहे. फसव्या घोषणा आणि जाहिरातींना पुन्हा बळी पडू नका. असे अनंत गीतेंनी आवाहन केले. काँग्रेसचा कार्यकर्ता सांगतोय अनंत गीते यांना मत म्हणजे राहुल गांधी यांना मत हे परिवर्तन स्वागतार्ह आहे. असे शेवटी अनंत गीते म्हणाले. सुनिल तटकरे हे उमेदवारी अर्ज भरेपर्यंत त्यांच्या उमेदवारांची खात्री नाही, चित्र बदलू शकेल, कारण रायगड मतदारसंघात मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय असे गीते म्हणाले. देशात विरोधी पक्ष न ठेवण्याचा निर्धार भाजपने केला आहे, शिवसेना, राष्ट्रवादी, शेकाप पक्ष फोडला हे देशातील , राज्यातील नागरिकांना रुचलेलं नाही, हा सुसंस्कृत महाराष्ट्राला लागलेला कलंक असल्याचे गीते म्हणाले. यावेळी अनिल तटकरे, राजेंद्र राऊत, दिनेश चिले आदींनी मार्गदर्शन केले.
लोकसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. रायगडात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचा संघर्ष सुरू आहे. महायुतीचे सुनिल तटकरे आणि महाविकास आघाडीचे अनंत गीते यांच्यात मुख्य लढत होत आहे. अनंत गीते यांनी प्रचाराला जोरदार सुरवात केली असून जनतेतून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद ही मिळत आहे.
यावेळी अनंत गीते,राष्ट्रवादी शरद पवार प्रदेश उपाध्यक्ष अनिल तटकरे,लोकसभा समन्वयक संजय कदम,शेकाप नेते सुरेश खैरे,जिल्हा संपर्कप्रमुख विष्णु भाई पाटील, सहसंपर्कप्रमुख किशोर भाई जैन,निवडणूक प्रमुख राजेंद्र राऊत,काँग्रेस तालुका अध्यक्ष अनिरुद्ध (बाबा) कुलकर्णी,आप तालुका संयोजक अशोक रायकर,उपजिल्हा प्रमुख अविनाश म्हात्रे, सुधागड तालुका प्रमुख दिनेश चिले, जगदीश गायकवाड, तालुका संपर्कप्रमुख विनेश सितापराव , ता संघटक नंदू सुतार,शेकाप महिला आघाडीच्या भारती शेळके,समृद्धी यादव,ऋतुजा दर्गे शहा, महिला आघाडीच्या पदाधिकारी दर्शना जवके,अश्विनी रुईकर, वर्षा सुरावकर ता चिटणीस किसन उमटे,उप तालुका प्रमुख किशोर दिघे, विभागप्रमुख नारायण दळवी, प्रवीण ओंबले,युवासेना पदाधिकारी प्रवीण पाटील, किरण पिंपळे, नंदू पालांडे,उप तालुका संघटक उदय धुमाळ, विभाग प्रचारप्रमुख राजेश परदेशी ,शहर प्रमुख ओमकार खोडागले,शहर संघटक विद्देश आचार्य,परली शाखा प्रमुख सचिन माने व सर्व शिवसेना शेकाप,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,आप घटक पक्षांचे पदाधिकरी कार्यकर्ते उपस्थित होते सदर सभा यशस्वी करण्यासाठी परळी शिवसेना शाखेने विशेष मेहनत घेतली.







