जगभरातील प्रतिष्ठित विद्यापीठांच्या क्रमवारीत पहिल्या २० विद्यापीठांमध्ये भारतातील एकमेव विद्यापीठाचा समावेश

नवी दिल्ली, दि. १२ (वृत्तसंस्था): लंडनमधील प्रसिद्ध उच्च शिक्षण विषयक विश्लेषण करणारी संस्था क्वाक्वेरेली सायमंड्सने (क्युएस) जगभरातील प्रतिष्ठित विद्यापीठांची क्रमवारीनुसार यादी जाहीर केली आहे. यात पहिल्या २० विद्यापीठांमध्ये भारतातील एकमेव विद्यापीठाचा समावेश आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला जगभरातील प्रतिष्ठित क्रमवारीत विसावे स्थान मिळाले आहे. या निमीत्ताने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने जागतिक स्तरावर पुन्हा एकदा भारताचा ठसा उमटवला आहे.

विविध पातळ्यांवर केलेल्या परीक्षणात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने ८१.३ गुणांसह क्युएसच्या श्रेणीत विसावे स्थान मिळवले. दरम्यान, डेव्हलपमेंट स्टडीज विभागात ससेक्स विद्यापीठ, ऑक्सफर्ड विद्यापीठ, सोएस विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स आणि केंब्रिज विद्यापीठाने पहिले पाचमध्ये स्थान पटकावले.

क्युएसने जाहीर केलेल्या जागतिक विद्यापीठ क्रमवारीनुसार, चेन्नई येथील सविथा वैद्यकीय आणि तांत्रिक विज्ञान संस्थेने देखील दंतचिकित्सा विषयासाठी जागतिक स्तरावर चोविसावा क्रमांक पटकावला आहे. तर अहमदाबाद, बंगळुरू आणि कोलकाता येथील प्रतिष्ठित भारतीय व्यवस्थापन संस्थानने (आयआयएम) व्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासासाठी जागतिक स्तरावर पहिल्या ५० मध्ये स्थान मिळवले आहे.

आणखी वाचा