देवरुख, दि. १३ : संगमेश्वर राज्य मार्गावर करंबेळे ग्रामपंचायत कार्यालया नजीकच्या असणाऱ्या सहानेच्याजवळील मोरीवर एक जुनाट वटवृक्ष कोसळल्याने मार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प होती. हि घटना शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने दुर्घटना टळली आहे.
साखरपा- देवरुख- संगमेश्वर या राज्य मार्गावर करंबेळे गावातील टप्प्यात रस्त्याच्या दुतर्फा गेले अनेक वर्षांचे जुनाट वटवृक्ष पाहायला मिळतात. मात्र त्यातील बहुतांश वटवृक्ष उन्मळून नष्ट झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी या भागामध्ये जंगलात वनवा गेला होता आणि या वृक्षाच्या बुंध्याजवळ साठलेल पाळा पाचोळा जळाला. यातच बुंधा जवळील सुकलेला भाग जळाल्याने हा भला मोठा वृक्ष रस्त्याच्या मधोमध शुक्रवारी सायंकाळी कोसळला.
यादरम्यान कोणतेही वाहन नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. रस्त्या मधोमध हा वृक्ष कोसळल्याने वाहतूक तासभर ठप्प होती. याची माहिती मिळाल्यानंतर बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. ही बाब सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सचिन मोहिते यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता स्वप्नील चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली. देवरुख बांधकाम उपविभागाने शासकीय ठेकेदार संदीप रहाटे यांचा जेसीबी घटनास्थळी तैनात केला. आणि काही कालावधीत हा वृक्ष बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.







