वंचित बहुजन आघाडीच्या रायगड लोकसभा उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी सावित्री सावित्री माईंच्या वेशभूषेत केला उमेदवारी अर्ज दाखल

रायगड, दि. १९ (प्रतिनिधी):  32 रायगड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे रण चांगलेच तापलेय. निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या रायगड लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी सावित्री माईंच्या वेशभूशेत  अलिबागेत छ शिवाजी महाराज आणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून वाजत गाजत रॅली काढून जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते ,  महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून वंचित च्या उमेदवार चव्हाण यांनी देखील अर्ज दाखल केल्याने मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.यावेळी बोलताना कुमुदिनी चव्हाण यांनी सांगितले की मी सावित्रीची लेक म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
एक महिला काय करू शकते याची चुणूक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी दाखवून देत मला उमेदवारीची संधी दिली आहे. कोकणात भूमी निसर्ग सौन्दर्याने नटली आहे. हिरवागार निसर्ग, अथांग सागर आहे, मात्र इथं बेरोजगारी मोठी आहे. म्हणून येथील तरुण, नागरिक मुंबई , बडोदा, पुणे  गुजरात, सुरत येथे रोजगार नोकरीच्या शोधात जातात.
कोकणात आंबा बाग, काजू यावर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण करू शकतो. पर्यटनाबरोबर  मासेमारी वर आधारित रोजगार निर्मिती आपण करू शकतो, बेरोजगारी समस्या सोडविण्यासाठी येत्या काळात काम करणार आहे. मला सुनिल तटकरे आणि अनंत गीते यांचे आव्हान मुळीच नाही. स्त्री शक्ती अफाट असते. मी जिंकण्यासाठी उभी आहे, कुणाची मते घेण्यासाठी, कुणाला हरविण्यासाठी उभी नाही, मला जिंकायच आहे, अंदर की बात है तीन एम एल ए मेरे साथ है,  मतदारसंघातील जनतेला बदल हवा असून प्रचार प्रसारात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे कुमुदिनी चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी  प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी राज्यभरात ऍड प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील लोकसभेचे उमेदवार यांना पोषक वातावरण असल्याचे सांगितले. रायगड मतदारसंघाच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, 32 रायगड लोकसभा उमेदवार कुमुदिनी चव्हाण, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष प्रदीप ओव्हाळ, दक्षिण जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, दक्षिण महासचिव सागर भालेराव, उत्तर महासचिव वैभव केदारी, महाराष्ट्र प्रदेश दिव्यांग समनव्यक ऍड सचिन गायकवाड , रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अमित गायकवाड,पेण तालुकाध्यक्ष देवेंद्र कोळी, रोहा तालुका अध्यक्ष देविदास जाधव  आदींसह राज्य, जिल्हा तालुका  पदाधिकारी आणि कार्यकर्ते  उपस्थित होते.

आणखी वाचा