संगमेश्वर, दि. ०७ (प्रतिनिधी) : रविवारी (७ जुलै) दुपारपासून सुरू असलेल्या पावसामुळे संगमेश्वर येथील सोनवी नदी व शास्त्रीखाडीच्या नेहमीच्या पातळीत वाढ होऊन हा हा म्हणता संगमेश्वर येथील मच्छि मार्केट, आठवडा बाजार, रामपेठेत पुराचे पाणी घुसू लागल्याने एकच धावपळ उडाली.
संगमेश्वर भागाला काल (६ जुलै) पावसाने दिवसभर चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे पुराचे पाणी येण्याची भीती होती; मात्र रात्री पावसाने विश्रांती घेतल्याने व रविवारी दुपारपर्यंत तेवढा जोर नसल्याने पुराची भीती दूर झालेली असतानाच आज दुपारनंतर पुन्हा पावसाने रौद्ररुप धारण केले. रविवारी दुपारपासून ढगफुटीसारख्या कोसळणाऱ्या पावसामुळे येथील सोनवी नदी तसेच शास्त्री खाडीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. या नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने पुन्हा एकदा पुराची भीती निर्माण होऊन ती काही तासांतच सत्यात उतरली.
बाजारपेठवत पाणी
संगमेश्वर येथील कोंबडी तसेच मच्छि मार्केट येथे पुराचे पाणी भरल्याने तेथील व्यापाऱ्यांची दुकानातील माल सुरक्षित स्थळी हालवण्यासाठी धडपड सुरू झाली होती. तर येथील आठवडा बाजारात सुमारे तीन ते चार फूट पाणी होते. येथील नितीन शेट्ये, प्रदीप शिंदे यांचे समर्थ मेडिकल, रुद्विक वडापाव सेंटर आदी दुकानात पाणी घुसले. तर त्या पुढील दुकानांही पुराची भीती असल्याने ते व्यापारी आपल्या दुकानातील व काही घरांनाही धोका असल्याने ते सुरक्षित स्थळी आपला सामान भरपावसातून हलवण्याची कसरत करत होते.
रामपेठ, बाजारपेठ, व आठवडा बाजार या ठिकाणची दुकाने पाण्याखाली गेली असून या ठिकाणी तीन ते चार फूट पाणी होते. तर या ठिकाणीहून मापारी मोहल्ला तसेच राष्ट्रीय महामार्गांवर जाणार मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झाला आहे.
अविश्रांत धो -धो कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पाणी पाणी होऊन संपूर्ण संगमेश्वर जलमय झाले असून जनजीवच विस्कळीत झाले आहे. रविवारी संध्याकाळी उशिरापर्यंत पाऊस उसंतच घ्यायला तयार नसल्याने व पुराचे पाणी भरण्याचा वेग पाहता संगमेश्वरवासिय भीतीच्या छायेत आहेत.
संगमेश्वर येथील पोलीस पाटील रंगराज कोळवणकर यांनी संगमेश्वरवासियांना पुराच्या धोक्यात पासून सावध राहण्याचे सूचना सर्वांना दिल्या.








