पोलादपूर, दि. १५ (शैलेश पालकर): तालुक्यातील आंबेनळी घाटातील चिरेखिंड ते आंबेमाची रस्त्यावर दरडीसह मातीचा ढिगारा झाडांसह रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाल्यानंतर तालुका प्रशासनाने तातडीने या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत करण्यात यश मिळविले. रविवारी महाबळेश्वर येथून परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या पर्यटकांचा यामुळे खोळंबा टाळण्यात आला.
पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर वाई सुरूर या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे व पोलादपूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार स्वप्नील कदम यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत पाहणी करून रस्ता सुरू करण्यासाठी तातडीने प्रयत्न केले. यावेळी तातडीने जेसीबी पाठवून रस्त्यावर आलेले झाडे तोडण्यात येऊन बाजूला सारण्यात आले. यावेळी दगड मातीचा ढिगारा बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आल्याचे तालुका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पोलादपूर तालुका आपत्ती निवारण पावसाळयात उद्भवणाऱ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याने कोणतीही दुर्घटना घडल्यास त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येईल, असा ग्वाहीयुक्त दिलासा पोलादपूर तहसिल कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षाकडून पोलादपूरच्या नागरिकांना देण्यात आला आहे.








