चिपळूणचे सुप्रसिद्ध गायक श्री.राजाभाऊ शेंबेकर यांना बालगंधर्व रंगसेवा पुरस्कार प्रदान

चिपळूण, दि. १९ :  दिनांक १५ जुलै रोजी महाराष्ट्राचे नाट्य दैवत बालगंधर्व यांची ५७ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली . बालगंधर्व यांच्या निधनानंतर त्यांचे जावई भास्करराव वाबळे यांनी बालगंधर्व संगीत रसिक मंडळ पुणे ही संस्था सुरू केली. त्या संस्थेमार्फत संगीत नाट्य विभागात भरीव काम करणाऱ्या व्यक्तीला पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
यावर्षी पुरस्कारांचे हे सत्तेचाळिसावे वर्ष आहे. यंदा चिपळूण येथील श्री.राजाभाऊ शेंबेकर यांना बालगंधर्व रंगसेवा पुरस्कार देऊन निवृत्त सरन्यायाधीश श्री. उदयजी लळीत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी माजी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री.सुरेश प्रभू , मा.कृष्णकुमार गोयल, मा. विजयकांत कुलकर्णी आणि मा.श्रीधर प्रभू हे मान्यवर उपस्थित होते. बालगंधर्व रंगमंदिरात रंगलेल्या या सोहळ्यात नामवंत गायिका लता शिलेदार, सुप्रसिद्ध गायक सर्वश्री महेश काळे, सुकृत ताम्हणकर, महादेव हरमलकर, शिवानंद दाभोळकर, निनाद जाधव, केदार कुलकर्णी सुधीर ठाकूर, अभय जबडे तसेच सौ.धनश्री गाडगीळ, सौ.माधुरी आंबेकर व कु.तन्वी गोरे यांचाही सन्मान करण्यात आला.
 आपल्या मनोगतात श्री.उदयजी लळीत यांनी बालगंधर्वांनी मराठी रसिकांना कसे घडवले ते आपल्या आजीच्या उदाहरणासह स्पष्ट केले. संस्थेचे अध्यक्ष सुरेश साखळकर यांनी आपल्या भाषणात बालगंधर्वांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
श्री. राजाभाऊ शेंबेकर यांनी या प्रसंगी मम आत्मा गमला हे नाट्य पद सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमानंतर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना श्री. राजाभाऊंनी आपण हा पुरस्कार बालगंधर्व यांचा प्रसाद म्हणून ग्रहण करतो असे सांगून आपल्या सर्व गायनगुरुंचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले.
श्री.राजाभाऊ शेंबेकर यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

आणखी वाचा