संगमेश्वर, दि. 22 (प्रतिनिधी) :
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमधील तूरळ येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर २ या शाळेच्या खोलीत सतत सुरू असलेल्या पावसामुळे पाणीच पाणी साचले असून, मुलांना बसण्यास जागा नसल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. दहा वर्षांपासून शाळेची दुरुस्ती न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून खोल्या दुरुस्तीचा प्रस्ताव देखील धूळखात पडून असल्याचे वास्तव आहे. या सर्व प्रकारातून रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे सरकारच्या वतीने विकासाच्या गप्पा मारल्या जातात, पण दुसरीकडे मात्र हे भीषण वास्तव सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे.
प्रगतीपथावर रत्नागिरी जिल्हा माझा असं म्हणत ज्या राज्याच्या प्रगतीशील वाटेविषयी लोकप्रतिनीधी चर्चा करत असतात. पण, याच महाराष्ट्राचं भविष्य असणारी पुढची पिढी सध्या ज्या अवस्थेत शिक्षणाचे धडे गिरवतेय ते पाहता राहून राहून ‘कसा प्रगती करेल रत्नागिरी जिल्हा माझा?’ हाच उद्विग्न प्रश्न उपस्थित राहत आहे. शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यावर भर दिला असल्याने यावर जिल्ह्यात शासन दरवर्षी लाखो रुपये खर्च करीत आहे. यामध्ये शाळा खोल्यांची दुरुस्ती, संरक्षकभिंती, नवीन इमारत, स्वच्छतागृह, यासह अनेक प्रकारची कामे शासन ठेकेदाराकरवी पूर्ण करून घेतात मात्र या सर्व प्रक्रियेतून तुरळ येथील “जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर २” ही वंचित राहिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या शाळेची स्थापना १९४७ रोजी करण्यात आली आहे. परंतु गेल्या दहा वर्षांपासून शाळेची दुरुस्ती न झाल्याची धक्कादायक बाब देखील यानिमित्ताने उघड झाली आहे. या जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग भरत आहेत. अक्षशः विद्यार्थ्यांना बेंचवर बसून पाण्यात पाय ठेवून शिक्षण घ्यावे लागत आहे. इमारतीच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
खोल्यांच्या दुरुस्तीसाठी गट शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र
शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिनांक १८ जून २०२४ रोजी पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी यांना पत्रक दिले आहे. यामध्ये शाळेच्या पहिल्या इमारतीतील अध्यापनासाठी वापरत असलेल्या तीन वर्गखोल्याचा स्लॅब पूर्ण गळक्या स्थितित आहे. तर दुसऱ्या इमारतीची वरची खोली पूर्णपणे गळत आहे. छताचे प्लॅस्टर, दरवाजे, खिडक्या बदलने आवश्यक आहे. वरील ३ वर्गखोल्या विध्यार्थ्यांना बसण्यायोग्य नाहीत. शाळेचे एकूण क्षेत्र ०.०६ असून जागा जि.प. रत्नागिरीच्या नावे आहे. सदर तीन वर्गखोल्यांची पत्रा शेड व त्यातील एका वर्गखोलीची वरील दुरुस्ती होणे आवश्यक आहे. सदर वर्गखोल्यांसाठी इतर दुसया योजनेतून अनुदान मंजूर अथवा प्रस्तावित नाही. तरी ३ वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीसाठी मंजूर मिळावी असे दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
वर्गखोली दुरुस्तीचा प्रस्ताव धुळखात पडून
जिल्ह्यात आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे या शाळेच्या खोल्यांना मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. शाळेच्या खोल्या दुरुस्तीचा प्रस्ताव धूळखात पडून आहे. गळती लागलेल्या खोल्यांमध्येच विद्यार्थ्यांचे वर्ग भरत असल्याने याबाबत शाळा व्यवस्थापन समितीने देखील ठराव केला आहे. मात्र या शाळेच्या वर्गखोली दुरुस्तीचा प्रस्तावाला एक महिना उलटून गेला तरी धूळखात पडून असल्याचे दिसून येत आहे. धोकादायक गळक्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना बसवून विद्यार्थ्यांच्या जीविताबद्दल तालुका प्रशासन किती गंभीर आहे हेच दिसून येत आहे.