गुहागर मधील साखरी बुद्रुक खुर्द मध्ये राबविण्यात आला सामूहिक शेती प्रकल्प

गुहागर, दि. २२ (प्रतिनिधी): तालुक्यातील साखरी बुद्रुक खुर्द इथे कुणबी एकता सामाजिक संघटनेच्या वतीने सामाजिक शेत हा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमासाठी सर्वप्रथम १५ किलो अंकुर १०१ या वाणाची पेरणी करून रोपे तयार करण्यात आली.ही रोपे दीड एकर क्षेत्रावर लावण्यात आली.
          कोकणातील तरुण गाव सोडून मुंबई गाठत असल्याने गावात शेती करायला कोणी मिळत नाही यासाठी कुणबी एकता संघटनेने हा सामाजिक उपक्रम राबविण्याचे ठरविले.या उपक्रमात गावातील सुमारे ८० ते ८५ बंधू भगिनींनी सहभाग घेतला.संस्थेचे सचिव सुनिल वरेकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, नुसती शेती करणे हा आमचा उद्देश नसून त्याबरोबर सामाजिक एकोपा जोपासला जावा हाही उद्देश आहे.या उपक्रमात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाल्याने काम कमी वेळात पार पडले.
          सामूहिक लावणी उपक्रमासाठी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.कुणबी एकता संघटनेचे मुंबई अध्यक्ष अनंत सुवरे, ग्रामीण अध्यक्ष सुभाष शितप, सचिव सुनिल वरेकर, ग्रामसेवक महेंद्र भुवड, उपसरपंच राजू पवार, ग्रा.पं. सदस्य समीर पेडणेकर, चंद्रकांत म्हसकर, मारुती मोहिते, रमेश पवार, दीपक पवार, पोलीस पाटील अमित पवार   ,दिगंबर हळदणकर इत्यादी मान्यवरांच्या मार्गदर्शन व उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.शेती आणि शेतकरी कमी होत असताना कुणबी एकता संघटनेने राबविलेल्या या उपक्रमाचे शृंगारतळी परिसरात कौतुक होत आहे.

आणखी वाचा