शेतकऱ्यांना ताकद देणाऱ्या एक हजार गाई वाटप योजनेचा प्रस्ताव तातडीने द्या – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी, दि. 22 (जिमाका) : मुंबई पुण्याला नोकरीनिमित्ताने जाणारा लोंढा गावातच थांबविण्यासाठी कृषी शिवाय पर्याय नाही. पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना ताकद देणारा आणि सेंद्रिय शेतीसाठी पूरक असा एक हजार गाई वाटप कार्यक्रम राबविण्यासाठी तातडीने प्रस्ताव द्यावा, असे सांगतानाच पालकमंत्री उदय सामंत यांनी बँकांनी नाहक त्रास देवून कर्ज रोखण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशाराही दिला.
केंद्र व राज्य पुरस्कृत विविध शासकीय योजनांची आढावा बैठक दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या डॉ. स्वामीनाथन सभागृहात आज झाली यावेळी आमदार योगेश कदम, कुलगुरु डॉ. संजय भावे, माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम,  कृषिभूषण नाथाराव कराड, संचालक डॉ. पराग हळदणकर, विभागीय कृषि सहसंचालक अंकुश माने आदी उपस्थित होते.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली.  पालकमंत्री श्री सामंत म्हणाले, शेतीला त्रास देणाऱ्या रानटी प्राण्यांपासून संरक्षणासाठी डीपीसीमधून लागेल तेवढा निधी द्यायला तयार आहे.  शासनाच्या विविध योजनांसाठी बँकांनी कर्ज देताना लाभार्थ्यांना नाहक त्रास देवू नये.  कर्ज रोखण्याचा प्रयत्न केल्यास टोकाचे पाऊल उचलून गुन्हे दाखल केले जातील.  विद्यापीठाच्या संशोधन विभागाने क्षेत्रीय स्तरावर घोंगडी बैठका घेवून शेतकऱ्यांशी चर्चा करावी.  बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे त्यासाठी कार्यशाळा आयोजित करावी.  तालुक्यातील भात क्षेत्र वाढविण्यासाठी कृषि विभागाने प्रयत्न करावेत.
माजी पर्यावरण मंत्री श्री. कदम म्हणाले, शेतकरी सक्षम होईल त्यादृष्टीने कृषि विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि बँकांनी प्रयत्न करायला हवेत.  नोकरीनिमित्त मुंबई पुण्यात स्थलांतर वाढल्याने शेतीक्षेत्र कमी झाले आहे हे वाढविण्यासाठी विशेषत: शेतकऱ्यांपर्यंत जावून विविध योजनांची माहिती सांगावी.  शेवगा, बांबू लागवड, आवळा लागवडीबरोबरच गायी म्हशी पालन योजनांसाठी एकत्र बैठक घ्या.
कृषिभूषण श्री. कराड यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.  विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आणखी वाचा