कशेडी घाटातील डेंजर झोनमध्ये केमिकल टँकर कलंडला

पोलादपूर, दि. ०९ (शैलेश पालकर)-: मुंबई गोवा महामार्ग क्रमांक 66 वरील कशेडी घाटातील भोगावच्या हद्दीत खचलेल्या डेंजरझोन घाटरस्त्यावर गेल्या महिन्यात गॅससिलींडरचा टेम्पो दरीत कोसळून झालेल्या अपघातानंतर आता महिनाभरात केमिकल वाहतूक करणारा टँकर घाटरस्त्यामध्ये आडवा होऊन अपघात झाला आहे. या अपघातातून सुदैवाने चालक बचावला आहे.

कशेडी टॅप आणि पोलादपूर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चालक अंकित राजेश कुमार यादव (वय 30रा.प्रतापगड, राणीगंज, उत्तर प्रदेश) हा आपल्या ताब्यातील टँकर (क्रमांक जी जे 13 बी डब्ल्यू 3544) घेऊन लोटे ते दौंड पुणे असा जात असताना कशेडी घाटातप्ब् भोगाव गावाच्या हद्दीतील दरवर्षी खचणाऱ्या घाटरस्त्यावर आला असता महामार्गावरील सुमारे 100ते 150 फूट लांब व दीड मीटर खोल खचलेल्या  रस्त्याचा अंदाज न आल्याने टँकर पलटी होऊन महामार्गावर असणाऱ्या दगड मातीच्या ढिगाऱ्यावरून टँकर आडवा झाला. या टँकरमध्ये ज्वालाग्रही आणि प्रदुषणकारी नसलेले फोम केमिकल असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

या घटनेची माहिती मिळताच कशेडी महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरिक्षक समेळ सुर्वे, पोलीस हवालदार शंकर कुंभार, रामागडे, चिकणे यांनी तातडीने धाव घेत मदतकार्य करून एकेरी वाहतूक सुरू ठेवल्याने कशेडी घाटामध्ये ट्रॅफिक जॅम टळला.

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाट मुंबई, पुणे व तळकोकणात ये-जा करणाऱ्या वाहनांची नेहमीच वर्दळ असते. मात्र गेल्या 20 वर्षांपासून भोगावच्या हद्दीत सुमारे 100 ते 150 फूट लांब रस्ता दरवर्षाप्रमाणे यंदाही सुमारे दीड मीटर खाली खचला आहे. या मार्गावर राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जाऊनही ठोस उपाययोजना होत नसल्याने रस्ता खचण्याचे आणि मलमपट्टी करण्याचे सातत्य कायम राहिले आहे. या खचलेल्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहने नादुरुस्त होण्याच्या व अपघात होण्याच्या घटना वारंवार होत आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी पोलादपूर तालुक्यातील प्रवासी जनतेकडून उघडपणे व्यक्त होत आहे. यासोबतच धामणदेवी ते कशेडी बंगला या 6 कि.मी.अंतरात डांबरीकरणाच्या दुपदरी महामार्गाला ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडून महामार्गाची चाळण झाली आहे.

यामुळे आगामी गौरी-गणपती सणापूर्वी तरी या जुन्या कशेडी घाटरस्त्याची डागडूजी करण्याची मागणी पोलादपूरवासियांकडून होत असून कशेडी घाटरस्ता वाहतुकीसाठी आणि गणेशभक्त चाकरमान्यांसाठी सुरळीत करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आणखी वाचा