पोलादपूर, दि. २६ (शैलेश पालकर)-: महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या महाड तालुक्यातील विविध रासायनिक कारखानदारीने पावसाळयात रात्रीच्यावेळी जल आणि वायू प्रदूषणाचा सपाटा लावला असून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर उग्र दर्पाच्या वायूमुळे वाहनचालकांना खोकल्याची उबळ येत असून गुदमरल्यासारखे होत आहे तर महाड तालुक्यातील सावित्री व काळ नदीमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून लाखो मासे मृत्यूमुखी पडल्याच्या घटनांमुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून संबंधित कारखान्यांविरूध्द कधी कारवाई करण्यात येणार असा संतप्त सवाल मच्छिमार तसेच महामार्गावर रात्री वाहने चालविणाऱ्यांकडून विचारला जात आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणादरम्यान महाड एमआयडीसी फाटयाजवळ फ्लायओव्हर तसेच व्हेईक्युजर ब्रिज बांधण्यात आल्याने मुळ महामार्गापेक्षा आता नवीन महामार्ग उंचावरून असल्याने या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या चालकांना रात्रीच्या वेळी उग्र रासायनिक दर्पामुळे गुंगी येत असून अनेक चालकांना ओकारी तसेच मळमळ होत असल्याचे आणि डोळयांची जळजळ झाल्याने तसेच गुदमरल्यासारखे झाल्याने वाहन चालविताना अडथळा झाल्याचे दिसून येत आहे. रात्रीच्यावेळी पाऊस पडत असताना या वायूप्रदूषणामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या रस्त्यावरील दूतर्फा असलेल्या प्रकाश झोतामध्ये पोलादपूर ते नडगाव फाटयापर्यंत प्रदूषणकारी वायूमुळे परिसरातील दृश्यमानता कमी झाली आहे. यामुळे आगामी गणेशोत्सव काळात या महामार्गावरून छोटया वाहनांना एमआयडीसीतील वायूप्रदूषणामुळे अडथळा होऊन अपघातांचे प्रमाण वाढीस लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाड एमआयडीसीतील रासायनिक कारखानदारी दिवसेंदिवस जलप्रदुषणदेखील वाढवत असून पोलादपूर तालुक्यात रात्रीच्यावेळी टँकर्सद्वारे केमिकल वेस्ट म्हणजे रासायनिक घनकचरा नदीपात्रात सोडण्याचा प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला आहे.
महाड औद्योगिक वसाहतीतील घातक रासायनिक सांडपाणी थेट सावित्री नदीपात्रात रात्रीच्यावेळी सोडण्यात आल्याने मागील 15 दिवसांपासून सावित्री नदी मोठया प्रमाणावर प्रदूषित झाली आहे. परिणामी, नदीतील लाखो मासे मृत होऊन तरंगत आहेत. याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करण्यात चालढकल करीत आहे.
सावित्री नदीत रासायनिक सांडपाणी सोडल्याने नदीतील पाण्याचा रंग पूर्णपणे लाल झाला असून हजारो टन मासे मृत्युमुखी पडून तरंगू लागले आहेत. अशी वस्तुस्थिती निदर्शनास आणून नदीपात्रालगतच्या पारंपारिक मच्छीमारी करणाऱ्या भोई समाजाला ऐन सणासुदीच्या दिवसात उपासमारीची वेळ ओढवल्याने भोई समाजाला प्रदूषण नियंत्रण महामंडळ व सीईटीपीने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अन्यथा भोई समाज महाड औद्योगिक वसाहतीतील सीईटीपीच्या कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करेल, असा इशारा दासगावमधील भोई समाजाचे नेते पांडुरंग सूर्यकांत निवाते यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसहित प्रदूषण नियंत्रण महामंडळ व सीईटीपी च्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
महाड एमआयडीसीच्या जल व वायू प्रदूषणावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियंत्रण राहिले नसल्याने महाड व पोलादपूर तालुक्यातील जनजीवन अडचणीत आले असल्याने राज्यसरकारने याप्रश्नी लक्ष देण्याची मागणी दोन्ही तालुक्यांतून होऊ लागली आहे.








