आरवली (संगमेश्वर), दि. २५ (प्रतिनिधी): प्रधानमंत्री ग्रामसडक योजना (भाग ३) अंतर्गत बांधण्यात आलेल्या आंबव पोंक्षे–आरवली मार्गाने पहिल्याच पावसात आपली शोकांतिका सुरू केली आहे. अवघ्या काही दिवसांतच रस्ता खचल्याने आणि पुरामध्ये मैलाभर पुरलेला दगड वाहून गेल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या रस्त्याच्या कामात सुरुवातीपासूनच गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. जिथे संरक्षण भिंतीची नितांत गरज होती, तिथे ती न बांधता, निवडक खासगी जागांवर भिंती उभारण्यात आल्याचे बोलले जात आहे. आंबव पोंक्षेचे सरपंच शेखर उकार्डे यांनी या संदर्भात वारंवार मागणी केली होती, मात्र ती दुर्लक्षित झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कामाचा दर्जा आणि नियोजनावर प्रश्नचिन्ह
या रस्त्याच्या कामासाठी अंदाजे ७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. तरीही, रस्त्याच्या ठिकाणी योग्य जलनिकासीची व्यवस्था नाही. काही ठिकाणी जुने पाईप टाकून औपचारिकता पार पाडल्याचे निदर्शनास आले आहे. शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी अडवणारी ही गटारे आक्रोशास कारणीभूत ठरत आहेत.
नाहरकत न घेता रस्ता, हमी कालावधीचा विचारही झिजला
रस्ता मंजुरीपूर्वी शेतकऱ्यांकडून नाहरकत घेतलेली नव्हती. ग्रामपंचायतीने मध्यस्ती करून जागा उपलब्ध करून दिली. पण त्या बदल्यात ठेकेदाराने दिलेली कामांची हमीही हवेतच विरली. रस्ता व शेत यामधील अंतर, गटारे, संरक्षक भिंती, पाईपलाइन आदी कामांमध्ये गोंधळ व अर्धवटपणा दिसून येतो.
तत्काळ चौकशीची मागणी
पंचायत व ठेकेदार या दोघांच्याही
उदासीनतेमुळे पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या दर्जाला धक्का बसला आहे. केंद्र शासनाच्या पथकाकडून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी तात्काळ व्हावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.