मान्सूनला ब्रेक : जिल्ह्यात उकाडा वाढला, पेरण्या खोळंबल्या; ११ जूनपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

रत्नागिरी, ३ जून (प्रतिनिधी) : जिल्ह्यात २९ मेपासून पावसाने विश्रांती घेतल्याने उकाड्याचा जोर वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांची पेरण्याची कामे खोळंबली असून उष्णतेमुळे जनजीवन त्रस्त झाले आहे. रविवारपासून जिल्ह्यात तुरळक सरींची नोंद झाली असली तरी त्यातून गारवा निर्माण होण्याऐवजी उकाडाच वाढत चालला आहे. सध्या जिल्ह्याचे कमाल तापमान ३३ अंश सेल्सियसच्या आसपास पोहोचले आहे.
दुसरीकडे, २४ मे रोजी केरळमध्ये वेळेआधी दाखल झालेल्या मान्सूनचा वेग सध्या मंदावल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. परिणामी, ११ जूनपर्यंत मान्सूनची पुढील वाटचाल थांबलेली असून, कोकणासह राज्यभरात उकाड्याने डोके वर काढले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ८ जूनपर्यंत जिल्ह्यात फारसा पाऊस पडणार नाही. मात्र, ११ जूननंतर बंगालच्या उपसागरात विकसित होणाऱ्या प्रणालीमुळे मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये ३ ते ६ जूनदरम्यान हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा आणि वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढू शकतो. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही भागांत आज मुसळधार पावसाची शक्यता असली तरी, पुढील काही दिवसांत पुन्हा उन्हाचा जोर राहणार आहे.
यंदाच्या जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. मात्र, हा पाऊस खंडात्मक स्वरुपाचा असणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करावा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहील, तर काही भागांत खंडही राहण्याची शक्यता आहे.
हवामानातील या चढ-उतारांमुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकही संभ्रमित आहेत. सध्याच्या उकाड्यामुळे शेतजमिनी कोरड्या पडल्या असून, लवकरात लवकर पावसाला सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आणखी वाचा