रत्नागिरीत ढगफुटीचा कहर! घरांत पाणी, रस्ते वाहून गेले, रेड अलर्ट जारी

रत्नागिरी, दि. १४ (प्रतिनिधी): राज्यात मान्सूनच्या पुनरागमनानंतर कोकणात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला असून, रत्नागिरी जिल्ह्याला प्रचंड तडाखा बसला आहे. विशेषतः राजापूर, पावस, आडीवरे, गोळप, भालावली, कोतापूर, नवेदर, धाऊलवल्ली, चिंचवाडी, बौद्धवाडी आदी भागात ढगफुटीसदृश पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी केला असून, प्रशासन सज्ज झाले आहे.
शुक्रवारी संध्याकाळपासून रात्रीपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे अर्जुना व कोदवली नद्यांना मोठा पूर आला. मध्यरात्री ३ वाजता राजापूर शहरातील गणेश वडापाव सेंटर पर्यंत पाणी शिरले. प्रसिद्ध आडीवरे येथील श्री महाकाली मंदिराच्या सभामंडपात तब्बल ३७ वर्षांनी पाणी साचले. भालावली, कशेळी, नवेदर, कोतापूर, धाऊलवल्ली परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धाऊलवल्ली भाटलेवाडीतील वहाळावरील पुल पुरात वाहून गेला असून, भालावली मिरवणेवाडीत दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला आहे.
कोतापूर गावात डांबरी रस्त्याची अक्षरशः चाळण
कोतापूर वड ते एकवीरा देवी मंदिर रस्त्यावरील नव्याने करण्यात आलेल्या डांबरीकरणाचा पुरामुळे अक्षरशः चुराडा झाला आहे. ठिकठिकाणी मोठाले खड्डे निर्माण झाले असून, गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. रिजवान मोनये यांच्या गॅरेजमध्ये पाण्याने थैमान घातले. संतोष नवरे, गौरव नवरे, विवेक व विनायक प्रभुघाटे, अरुण दीक्षित आदींनी मदतीचा हात पुढे करत साहित्य बाजूला केले. लक्ष्मी केशव मंदिराजवळील पुलाचेही मोठे नुकसान झाले असून, ओंकार प्रभुघाटे यांच्या गारगेश्वर मंदिरासमोरील गडगा पूर्ण वाहून गेला आहे.
गुहागर तालुक्यातही तुफान पावसाचा फटका
गुहागर तालुक्यातील पालशेत सावरपाटी परिसरात ८ घरांमध्ये पाणी शिरले. असगोलीतील सखल भागातील रस्त्यावर तीन फूट पाणी साचल्याने पुलावरील डांबर उखडून टाकले. गावात भीतीचे वातावरण आहे.
पावस बाजारपेठेत घरांना आणि दुकाने पाण्याखाली
पावस, गोळप भागात ढगफुटीसदृश पावसामुळे बाजारपेठ आणि घरे पाण्याखाली गेली. गोळप साई मंदिराजवळ मानेवाडीत सागर मोहिते यांच्या घरामागे मातीचा ढिगारा कोसळून दोन स्कूटर्स अडकल्या होत्या. ग्रामस्थांनी त्या बाहेर काढल्या. आडिवरे गावातील महाकाली मंदिरातही पाणी शिरले.
हरचिरी-चिंचवाडी-बौद्धवाडी रस्त्यावर दगडांची अडथळेबंदी
हरचिरी चिंचवाडी मार्गे जाणाऱ्या बौद्धवाडी-उपळे फाटा रस्त्यावर दरड व दगड आले असून, प्रशासनाकडून रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
शासनाचा तत्काळ प्रतिसाद, पंचनाम्याचे आदेश
राजापूरचे तहसीलदार विकास गंबरे यांनी नुकसानग्रस्त भागातील तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश दिले असून, महसूल विभाग आणि ग्रामपंचायतीकडून कार्यवाही सुरू आहे. भालावली, कोतापूर, गोळप, पावस, मावळंगे, गावखडी भागात पंचनामे करण्यात आले असून, सुमारे ७.५ लाख रुपयांचे प्राथमिक नुकसान नोंदवले आहे, अशी माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.
पावसाची आकडेवारी (१३ जून रोजीच्या नोंदी):
राजापूर – 119.87 मिमी
रत्नागिरी – 77.55 मिमी
इतर तालुके: मंडणगड – 31.75, खेड – 48.57, दापोली – 47.57, चिपळूण – 25.56, गुहागर – 22.80, संगमेश्वर – 51.91, लांजा – 58.60
जिल्हा एकूण – 484.18 मिमी
सरासरी – 53.79 मिमी
राज्यभर रेड अलर्टचा इशारा
हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकणात १४ ते १९ जूनदरम्यान जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर ठाणे, पुणे, मुंबई, सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन: सतर्क राहा, सुरक्षित रहा!

आणखी वाचा