इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; मावळमध्ये भीषण दुर्घटना, 4 मृत – 32 जखमी, अनेक पर्यटक बेपत्ता

पुणे, दि. १५ : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी दुपारी पर्यटकांनी गजबजलेल्या इंद्रायणी नदीवरील पूल अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून, ३२ जण जखमी झाले आहेत. यामध्ये सहा जण गंभीर असून, अनेक पर्यटक अद्यापही बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. कुंडमळा हे पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक या भागात आले होते. इंद्रायणी नदीवर उभा असलेला पूल जुना आणि जीर्ण अवस्थेत होता. पुलावर गर्दी वाढत असतानाच तो अचानक कोसळला. या घटनेत काही पर्यटक थेट नदीत कोसळले.
दुर्घटनाग्रस्त परिसरात लगेचच हाहाकार उडाला. स्थानिकांनी सुरुवातीला बचावकार्य सुरू केलं. त्यानंतर तळेगाव दाभाडे पोलिसांसह एनडीआरएफचं पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. सध्या बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त करत तातडीने मदतकार्य वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा प्रशासन, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि वैद्यकीय पथकांनी आपापल्या पातळीवर काम सुरू केले आहे.
दरम्यान, या पुलाचा वापर केवळ शेतकऱ्यांसाठीच केला जात होता, मात्र काही काळापासून पर्यटक आणि वाहनांच्या मोठ्या संख्येमुळे तो दबावात आला होता. स्थानिकांनी अनेकदा प्रशासनाला सूचना दिल्या होत्या, मात्र उपाययोजना न झाल्याने अखेर दुर्घटना घडल्याचे आरोप होत आहेत.

आणखी वाचा