शाळा सुरू, पण दुरुस्ती रखडलीच!

रत्नागिरी, दि. १८ : जिल्ह्यात नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असली, तरी अनेक प्राथमिक शाळा अजूनही दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून २०६ प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आलेल्या कामांपैकी केवळ १३० कामे पूर्ण झाली असून, ४५ शाळांमध्ये कामे सुरू आहेत. मात्र, तब्बल ३१ शाळांमध्ये दुरुस्तीची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ३ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील धोकादायक अवस्थेतील शाळा दुरुस्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. परंतु, काही ठिकाणी कामे संथ गतीने सुरु आहेत, तर काही ठिकाणी अजूनही प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही.
जिल्ह्यातील अनेक शाळा डिजिटल पद्धतीने पुढे जात असतानाच काही शाळांची इमारती मात्र अजूनही डागडुजीच्या प्रतिक्षेत आहेत. मागील सर्वेक्षणानुसार, जिल्ह्यातील २११ प्राथमिक शाळांची इमारत दुरुस्ती आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले होते. यासाठी प्रशासनाने कार्यारंभ आदेशही दिले होते, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणीत अडथळे दिसत आहेत.
या रखडलेल्या कामांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागातील बऱ्याचशा शाळांमध्ये गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांच्या मूलभूत सुविधांची पूर्तता वेळेत होणे अत्यावश्यक आहे.
शासनाच्या निधीमंजुरीनंतरही काही शाळांचे काम सुरू न होणे, ही बाब पालकांमध्ये चिंतेची लाट निर्माण करत आहे. आता शिक्षण विभाग आणि प्रशासनाने तातडीने लक्ष घालून उर्वरित कामे पूर्ण करावीत, अशी मागणी शिक्षणप्रेमी नागरिकांमधून होत आहे.

आणखी वाचा