रत्नागिरी, दि. २६ : भाजप महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या शिष्टमंडळाने आज रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देत ब्रेस्ट व गर्भपिशवी कॅन्सरविषयी माहिती घेतली. महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढावी आणि लवकर निदान व्हावे, यासाठी मोफत तपासणी कॅम्प आयोजित करण्यासंदर्भात डॉक्टरांशी सविस्तर चर्चा झाली.
शहर व जिल्ह्यातील प्रत्येक प्रभागामध्ये अशा शिबिरांचे आयोजन करता येईल का, याबाबत मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर प्रस्ताव मांडला. डॉक्टरांनी यासाठी सहकार्याची तयारी दर्शवली असून आवश्यक मनुष्यबळ व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला.
या भेटीदरम्यान महिला मोर्चाच्या वतीने अधिकृत निवेदन सादर करण्यात आले. यामागचा हेतू म्हणजे महिलांमध्ये कॅन्सरसंबंधी जनजागृती, वेळेवर निदान आणि उपचाराकरिता पोच उपलब्ध करून देणे हा आहे. लवकरच तपशीलवार योजना जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या शिष्टमंडळात सहभागी महिला पदाधिकारी पुढीलप्रमाणे –
जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे, सरचिटणीस सौ. नुपूर मुळे, शहराध्यक्षा सौ. पल्लवी पाटील, तालुकाध्यक्ष सौ. प्रियल जोशी, माजी नगरसेविका सौ. सुप्रिया रसाळ, सौ. प्रणाली रायकर, सौ. भक्ती दळी, सौ. सायली बेर्डे, सौ. वैभवी शिवलकर, सौ. कामना बेग, सौ. मनाली राणे व सौ. सारिका शर्मा यांचा समावेश होता.
भाजप महिला मोर्चाच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, यामुळे ग्रामीण व शहरी भागातील महिलांना वेळेवर तपासणीसह उपचाराचा मार्ग मोकळा होणार आहे.