गुहागर, दि. २७ (उत्तम पवार): मुंबईतील ऐतिहासिक चैत्यभूमी या पवित्र स्थळी, गुहागर तालुक्यातील तळवली (गाव/मुंबई) येथील बौद्धजन सहकारी संघ शाखा क्र. १८ आणि भारतीय बौद्ध महासभा शाखा तळवली यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदानाचा सामाजिक आणि धार्मिक उपक्रम रविवार, २२ जून रोजी सकाळी १०.३० वाजता अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
या उपक्रमामागे तळवली येथील हेमंत अनंत पवार (पूर्व भिक्खू अभिधम्मपाल) यांची प्रेरणा होती. चैत्यभूमीचे प्रमुख भंते भिक्खू बी. संघपाल महाथेरो, भंते विशुद्ध बोधी, भंते सुमेध बोधी, तसेच चैत्यभूमी व्यवस्थापन समितीचे प्रदीप कांबळे आणि मिलिंद कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
सुरुवातीला चैत्यभूमी येथे त्रिसरण पंचशील व बुद्ध पूजापाठ घेण्यात आले व भंते बी. संघपाल महाथेरो यांनी धम्मदेसना दिली. तद्नंतर उपासक राकेश हरिश्चंद्र पवार यांनी प्रास्ताविक करून या उपक्रमाचे सामाजिक महत्त्व स्पष्ट केले. उपस्थित दोन्ही शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी पूज्य भन्तेजी आणि चैत्यभूमी समितीचे सहाय्यक व्यवस्थापक उपासक मिलिंद कदम यांच्याकडे एकूण दहा वृक्षांचे दान करण्यात आले. हे वृक्ष फक्त निसर्गासाठी नव्हे तर पुढील पिढ्यांना दिलेले धम्ममूल्यांचे वारसाहक्काचे प्रतीक आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. यानंतर उपासक धीरज शांताराम पवार यांनी या कार्यक्रमानिमित्त लिहिलेले काव्य सादर करण्यात आले. यावेळी बौद्धजन सहकारी संघ शाखा तळवलीचे अध्यक्ष प्रभाकर गणू पवार, उपाध्यक्ष मनेश सुधिर पवार, सचिव अमित भागुराम पवार, सहसचिव योगेश सुदाम पवार, कोषाध्यक्ष राकेश हरिश्चंद्र पवार, हि. तपासनीस महेश रमेश पवार तर भारतीय बौद्ध महासभा शाखा तळवलीचे अध्यक्ष दिनेश सावळाराम पवार, सचिव अमोल पवार, हि. तपासनीस विवेक कांबळे, संदेश वाहक ऋषिकेश पवार आदी पदाधिकारी व दोन्ही शाखेतील बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.
उपासक राकेश हरिश्चंद्र पवार यांनी सांगितले की, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी हे स्मृतीस्थळ असून येथील स्तूप आंबेडकरवादी जनतेचे आणि बौद्ध अनुयायांचे एक प्रमुख श्रद्धास्थान आहे. येथील सुशोभीकरणासाठी वृक्ष दान करण्याची आम्हाला संधी मिळाली हे आमचं भाग्य असून आमच्यासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. तसेच आज आम्ही दोन्ही शाखा एकत्र आलो आहोत, येथून एक नवीन संकल्प घेऊन आम्ही आमच्या संघटनेचे काम यापुढे यशस्वी करत राहू, असेही त्यांनी सांगितले.
वृक्षदान कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सर्व उपस्थितांना उपासक रविंद्र अनंत पवार आणि परिवाराकडून अल्पोपहार देण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी पारमी रविंद्र पवार हिने केले तर वृक्ष दान करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल चैत्यभूमी व्यवस्थापन समितीचे व सर्व उपस्थितांचे उपासक अमोल व योगेश पवार यांनी आभार मानले.