देवरुखचे गायक ठरले ‘आयडॉल’; गुणवंतांचा देवरुख गुणगौरव समितीकडून सत्कार

देवरुख, दि. २७ (प्रतिनिधी) : रत्नागिरी येथील गुंजन इव्हेंट्सतर्फे आयोजित ‘रत्नागिरी आयडॉल कराओके’ गायन स्पर्धेत देवरुखच्या गायकांनी उत्तम कामगिरी करत सुयश मिळवले. या विजेत्या गायकांचा देवरुख गुणगौरव समितीतर्फे सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी या सत्कारासाठी पुढाकार घेतला.
या स्पर्धेची संकल्पना देवरुख येथील ॲड. सरताज कापडी यांची होती. स्पर्धा रत्नागिरीतील वि. दा. सावरकर नाट्यगृहात संपन्न झाली. अंतिम फेरीत ५२ स्पर्धकांनी आपल्या गायनकलेने रंगतदार सादरीकरण केले. या फेरीत देवरुखच्या डॉ. प्राजक्ता कुलकर्णी यांनी द्वितीय तर रवी जाधव यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच गुंजन खवळे आणि चिराग अमर पवार यांनी उत्तेजनार्थ पुरस्कार मिळवला.
या सर्व विजेत्यांचा देवरुख गुणगौरव समितीतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी कोलकाता येथे झालेल्या ‘ऑनलाईन गोल्डस्टार सिंगर सिझन-२’ मध्ये पुरस्कार प्राप्त करणारे प्रवीण हर्डीकर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ललित कला अकॅडमीच्या प्राचार्या नृत्यालंकार शिल्पा भीडे-मुंगळे उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान देवरुखच्या विविध गायकांनी कराओकेवर सुरेल गाणी सादर करत उपस्थितांची मनं जिंकली.
सत्काराला उत्तर देताना डॉ. प्राजक्ता कुलकर्णी म्हणाल्या, “वर्तुळाच्या बाहेर पडल्यानंतरच आपली खरी क्षमता समजते. त्यामुळे प्रत्येक कलाकाराने आपल्या मर्यादेच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”
प्राचार्या शिल्पा मुंगळे-भिडे यांनी सांगितले की, “गायन, वादन किंवा नृत्य असो, त्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तेच कलाकाराच्या दर्जात सातत्य टिकवून ठेवू शकते.”
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवरुख गुणगौरव समितीच्या सदस्यांनी मेहनत घेतली. कलाकारांचा गौरव करताना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं.

आणखी वाचा