चिपळूण, दि. २७ (प्रतिनिधी) : कोणताही खास क्लास नाही, ना विशेष मार्गदर्शन… तरीही चिपळूणसारख्या छोट्या शहरातील डॉ. भक्ती पवार हिने औषध निर्माण शास्त्रात नायपर, अहमदाबाद या देशातील प्रथितयश संस्थेतून पीएच.डी. मिळवत देशात आठवा क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशामागे आहे ती तिची मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास, असे गौरवोद्गार परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका व भाजपच्या माजी शहराध्यक्ष सौ. वैशाली निमकर यांनी काढले.
शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूलची माजी विद्यार्थिनी असलेल्या भक्तीचा सत्कार नुकताच भाजप चिपळूण शहर मंडळातर्फे तिच्या राहत्या घरी करण्यात आला. यावेळी सौ. निमकर बोलत होत्या.
या सत्कारप्रसंगी शहराध्यक्ष शशिकांत मोदी, विजय चितळे, अर्बन बँकेच्या संचालिका दीपा देवळेकर, सारिका भावे, प्रणाली सावर्डेकर, अश्विनी वरवडेकर, विनायक वरवडेकर, निनाद आवटे, अभिजीत सावर्डेकर, महेंद्र पवार, विमल लढ्ढा, मानसी पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
डॉ. भक्तीने औषध निर्माण शास्त्रातील ‘फार्मास्युटिक्स’ या विषयात पीएच.डी. पदवी मिळवून चिपळूण तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील पताका उंचावली आहे. तिच्या यशामुळे परिसरात अभिमानाची लहर असून, ती विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहे.