रत्नागिरी, दि. ३ (प्रतिनिधी): रत्नागिरीतील भगवती किल्ल्याजवळ समुद्रात मृत अवस्थेत आढळून आलेल्या तरुणीच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ही तरुणी नाशिक येथील सुखप्रीत कौर असून, ती आयडीबीआय बँकेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. मृतदेह सापडल्यावर तिची ओळख पटवण्यासाठी सुरुवातीला मोठे प्रयत्न झाले. अखेर तिच्या वडिलांनी घटनास्थळी येत आपली ओळख पटवताच एक भावनिक स्फोट केला. “माझी लेक आत्महत्या करणार नव्हती… तिचा घात झाला आहे!” अशा शब्दांत त्यांनी संताप व वेदना व्यक्त केल्या.
प्रकाशसिंह कौर हे सुखप्रीतचे वडील रत्नागिरीत दाखल झाल्यावर त्यांनी थेट घटनास्थळी भेट दिली. अश्रू दाटलेल्या डोळ्यांनी त्यांनी स्पष्ट सांगितले की, जर तिच्या मनात आत्महत्येचा विचार असता, तर ती नाशिकमध्येच असा निर्णय घेतला असता. रत्नागिरीला ती आलीच कशाला? ही मुलगी इतकी दुर्बल नव्हती. ती कधीही पळपुटी निर्णय घेणारी नव्हती. तिच्या घरी एक चिठ्ठी सापडली आहे, त्यात ती संकटात असल्याचे म्हटले आहे. “मी संकटात अडकले आहे, मी कोणाला सांगू शकत नाही, मला काय करावे समजत नाही…” असे ती लिहून गेली होती. वडिलांच्या म्हणण्यानुसार, ही चिठ्ठी आत्महत्येस प्रवृत्त करणारी नसून, तिला अडचणीत आणणाऱ्या परिस्थितीचे प्रतीक होती.
या प्रकरणात प्रकाशसिंह कौर यांनी थेट जोशन नायक या तरुणाचे नाव घेतले आहे. “त्याने प्रेमाचे नाटक केले, भावनिक फसवणूक केली, सतत तिचा पाठपुरावा केला आणि तिला अशा टोकाच्या निर्णयाकडे लोटले,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. जोशन हा सध्या रत्नागिरीतील आयडीबीआय बँकेत कार्यरत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बेंगळुरूतील प्रशिक्षणादरम्यान सुखप्रीत आणि जोशन यांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यातील संवाद वाढत गेला. तिच्या मैत्रिणींच्या सांगण्यानुसार, ती पूर्वी दोन वेळा रत्नागिरीला येऊन त्याला भेटली होती.
या घटनेची माहिती एका बँक कर्मचाऱ्याने पोलिसांना दिली होती. सुखप्रीतने मृत्यूच्या आधी दुसऱ्या व्यक्तीच्या फोनवरून या कर्मचाऱ्याशी संवाद साधल्याचेही समोर आले आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिच्या ओळखीची खातरजमा केली. मृतदेहाजवळ आढळलेले कपडे, तिचा चेहरा आणि अन्य ओळख पटवणारे संकेत यांचाही अभ्यास करण्यात आला.
सुखप्रीत कौरने आत्महत्या केली की मोबाईलवर सेल्फी काढताना तिचा तोल गेला, यावर अजूनही स्पष्टता नाही. रविवारी सकाळी ही घटना घडल्याची माहिती मिळताच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. रत्नागिरी शहरातील किल्ल्याजवळ बसून काही काळ ती एकटी दिसली होती. त्यानंतर अचानक ती दिसेनाशी झाली आणि काही वेळाने तिचा मृतदेह समुद्रात तरंगताना दिसला.
या प्रकरणाचा तपास रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर, उपविभागीय अधिकारी निलेश माईनकर, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांकडून सुखप्रीतच्या कॉल तपशीलांची, डिजिटल संवादाची व संपर्कातील व्यक्तींची सखोल चौकशी केली जात आहे.
सुखप्रीतच्या कुटुंबीयांचा ठाम विश्वास आहे की, हा केवळ आत्महत्येचा नाही, तर नियोजित मानसिक छळ, फसवणूक आणि भावनिक जबरदस्तीमुळे घडलेला घातपात आहे.