देवरुख, दि. ०६ : स्मार्ट मिटर बसविण्याच्या निर्णयाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध होत असून, काँग्रेस पक्ष व अध्यक्ष शेतकरी-कष्टकरी संघटना अशोकराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली कोसुंब येथे ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत स्मार्ट मिटर बसविण्यास ठाम विरोध करण्याचा ठराव एकमताने पारित करण्यात आला.
या वेळी विनायक पोटफोडे, रमेश पोरे, किरण कोसुंबकर, शंकर खानविलकर, अरुण पोरफोडे, विद्याधर पोटफोडे, प्रमोद पोटफोडे, बारगुडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
बैठकीत बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितले की, “स्मार्ट मीटर लावल्यास शेतकरी, गरीब व मध्यमवर्गीय उपभोक्त्यांवर आर्थिक भार पडणार आहे. या निर्णयामुळे लोकांची पिळवणूक होणार असून, त्याला गावपातळीवर तीव्र विरोध केला जाईल.”
या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या बैठका तालुक्याच्या विविध गावांमध्ये व विभागनिहाय घेण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. या अभियानात जनजागृती करून ग्रामस्थांचा विरोध अधिक तीव्र करण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला.
शेतकऱ्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवत काँग्रेस व शेतकरी संघटनांनी या मुद्द्यावर लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.