रत्नागिरी, दि. ८ जुलै (प्रतिनिधी) – “सरकारची दडपशाही आणि मराठी माणसावर अन्याय मनसे सहन करणार नाही,” असा तीव्र इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी दिला. मीरा-भाईंदर येथे मराठी भाषेसंदर्भातील मोर्चाला सुरुवातीला नाकारलेली परवानगी आणि त्यानंतर मध्यरात्री मनसे नेते अविनाश जाधव व संदीप राणे यांना अटक करण्यात आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली असून, कोकणातही याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.
मनसेचे नेते प्रकाश महाजन कोकण दौऱ्यावर असताना, खेड तहसील कार्यालयासमोर राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे आणि इतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. यावेळी “मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो आहोत, पण सरकारची दादागिरी सहन करणार नाही,” असे प्रकाश महाजन यांनी ठामपणे सांगितले.
मोर्चाला परवानगी नाकारून नेत्यांना अटक का करण्यात आली, असा सवाल उपस्थित करत महाजन म्हणाले, “सरकार घाबरतेय का? ही लोकशाही आहे की दडपशाही?” तसेच “मराठी माणूस कोणत्याही पक्षाचा असो, अन्याय झाल्यास मनसे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांबाबत विचारले असता, महाजन म्हणाले, “मराठीच्या मुद्द्यावर सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. या संदर्भातला अंतिम निर्णय राजसाहेब घेतील आणि तोच निर्णय आम्हाला मान्य असेल.”
मनसेच्या निदर्शनामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी तहसीलदारांना निवेदन देत केंद्र व राज्य सरकारच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवला. रत्नागिरी जिल्ह्यात मनसेच्या आक्रमक पवित्र्यामुळे स्थानिक राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.