अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे निधन – पत्रकारिता व प्रशासकीय क्षेत्रात शोककळा

मुंबई, दि. १३ जुलै (प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दीर्घकालीन जनसंपर्क अधिकारी आणि माहिती व जनसंपर्क विभागातील वरिष्ठ सहाय्यक संचालक संजय देशमुख (वय ५५) यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने राज्याच्या प्रशासकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
देशमुख हे सध्या मुंबईतील वरळी येथे वास्तव्यास होते. त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सोमवार, १४ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता दादर येथील स्मशानभूमीत करण्यात येणार आहेत.
संजय देशमुख यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात पत्रकारितेपासून केली होती. ‘मुंबई दिनांक’ आणि ‘दैनिक सकाळ’ या माध्यमांतून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात ठसा उमटवल्यानंतर त्यांनी शासकीय सेवेत प्रवेश केला. रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून त्यांनी प्रभावी सेवा दिली. त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे OSD म्हणूनही त्यांनी काम पाहिले. मागील पंधरा वर्षांपासून ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत होते.
त्यांच्या निधनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त करताना म्हटले, “संजय देशमुख हे माझे विश्वासू, अभ्यासू आणि संयमी सहकारी होते. त्यांच्या निधनाने माझ्यावर आणि माझ्या कार्यालयावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.”
देशमुख यांच्या जाण्याने एक सोज्वळ, व्यावसायिक, माध्यमांशी सुसंवाद ठेवणारा आणि संयमित अधिकारी गमावल्याची भावना पत्रकार आणि प्रशासकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी पक्षाचे पीआरओ श्री. संदीप कांबळे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, “शुक्रवारीच विधानभवनात त्यांच्यासोबत जेवण झाले. ती शेवटची भेट ठरली. देशमुख सर हे माझं प्रेरणास्थान होते.” तर ज्येष्ठ पत्रकार राजा आदाटे यांनीही, “दैनिक आज दिनांकमध्ये आम्ही एकत्र काम करत होतो. सरकारी सेवेत गेल्यावरही त्यांनी मैत्री कायम ठेवली,” अशा शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली.
संजय देशमुख हे मूळचे सातारा जिल्ह्यातील उंब्रज गावचे होते. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जावई होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने एक संवेदनशील आणि जनतेशी जोडलेला अधिकारी काळाच्या पडद्याआड गेला आहे.

आणखी वाचा