रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा

रत्नागिरी, दि. १५ जुलै (अंकुश कदम) – सोमवारी रात्रीपासून कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यावर पावसाने हाहाकार माजवला असून मंगळवारी दुपारपर्यंत मुसळधार पावसाचा जोर कायम राहिला. यामुळे संगमेश्वर, खेड, गुहागर, लांजा, दापोली, मंडणगड आदी तालुक्यांतील अनेक भागांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते, बाजारपेठा, मंदिरे, शाळा, घरे आणि शेती पाण्याखाली गेली असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.

संगमेश्वरात रामपेठ बाजारात पूरसदृश्य परिस्थिती

संगमेश्वर आठवडा बाजारात मंगळवारी सकाळीच पुराचे पाणी शिरले. रामपेठ भागातील अनेक दुकाने पाण्याखाली गेली असून व्यापाऱ्यांना लाखोंचे नुकसान सहन करावे लागले. विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जाण्यास अडचण निर्माण झाली. संगमेश्वर–देवरूख मार्गावरील लोवले येथे मोरीवर पाणी साचल्याने रस्ता बंद करण्यात आला होता.

खेड मटन मार्केट परिसरात जीव धोक्यात; तीन तरुणांचे धाडस

खेड शहरातील मटन मार्केट परिसरात अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. या पाण्यात दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा जीव अडकण्याची वेळ आली. मात्र परिसरातील सरफराज पांगारकर, एजाज खेडेकर व जुईकर यांनी प्रसंगावधान राखत तिला सुखरूप बाहेर काढले. त्यांच्या या धाडसाचे खेडमध्ये कौतुक होत आहे.

कशेडी घाट परिसरात दरड कोसळली; शेतीचे मोठे नुकसान

खेड तालुक्यातील कशेडी गावाजवळ दरड कोसळल्याने भातशेतीवर मोठा परिणाम झाला आहे. महाड-पोलादपूर मार्गावरही जोरदार पावसामुळे अडथळे निर्माण झाले आहेत.

गुहागर तालुक्यात दरड रस्त्यावर; वाहतूक ठप्प

पाचेरी आगर–बौद्धवाडी भागात कालपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळून रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. तहसीलदार परिचित पाटील यांनी तात्काळ रस्ता मोकळा करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

एसटी सेवा बंद; नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल

आवरे–पाचेरी मार्गावरील पूल धोकादायक ठरल्याने एसटी प्रशासनाने या मार्गावरील सेवा बंद केली आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थी आणि कर्मचारीवर्ग हैराण झाला असून एसटी प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली जात आहे.

लांजा तालुक्यात श्री दत्त मंदिर पाण्याखाली, काजळी नदी रौद्ररूपात

लांजा तालुक्यातील आंजणारी येथील ऐतिहासिक श्री दत्त मंदिर पूर्णतः पाण्याखाली गेले आहे. काजळी नदी पात्राबाहेर पडल्याने मंदिर परिसर, मुख्य रस्ते, प्रांगण, गाभारा सर्वत्र पाणी भरले आहे. विजेचा पुरवठा खंडित झाला असून अनेक कुटुंबे सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाली आहेत.

जिल्ह्यातील प्रमुख पावसाचे आकडे (15 जुलै 2025)

  • संगमेश्वर – 142.25 मिमी

  • रत्नागिरी – 143.11 मिमी

  • चिपळूण – 134.56 मिमी

  • मंडणगड – 114.00 मिमी

  • गुहागर – 111.40 मिमी

  • लांजा – 112.20 मिमी

  • खेड – 96.85 मिमी

  • दापोली – 93.71 मिमी

  • राजापूर – 85.87 मिमी

आजचा एकूण पाऊस – 1033.95 मिमी | सरासरी – 114.88 मिमी

प्रशासन सतर्क; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

जिल्ह्यातील सर्व तालुका व शहर प्रशासन अलर्ट मोडवर असून पूरप्रवण भागात मदत पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. हवामान विभागाने पुढील ४८ तास अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या परिस्थितीमुळे जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. प्रशासनाकडून संभाव्य आपत्तीला सामोरे जाण्यासाठी युद्धपातळीवर तयारी केली जात आहे.

आणखी वाचा